Suraj Chavan: लातूरमध्ये काल (20 जुलै) झालेल्या राड्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांनी आज दिलगिरी व्यक्त केली आहे. छावा संघटनेच्या (Chava Sanghatana) विजयकुमार घाडगे (Vijay Ghadge) यांना झालेल्या मारहाणप्रकरणी त्यांची भेट घेऊन लवकरच गैरसमज दूर करू अशी प्रतिक्रियासूरज चव्हाण यांनी दिली. सोशल मीडियावर पोस्ट करत सूरज चव्हाण यांनी काल घडलेल्या मारहाणीवरुन माफी मागितली आहे.
आज सकाळी सूरज चव्हाण यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध करत माफी मागितली. त्यांनी यामध्ये म्हटले आहे की, प्रसारमाध्यमांवर अशा बातम्या चालू आहेत की, शेतकऱ्याच्या प्रश्नावर आवाज उठवला म्हणून विजय घाडगे पाटील यांना आम्ही मारहाण केली. मी स्वत: शेतकऱ्याचा मुलगा आहे. कोणी शेतकऱ्यांच्या (Farmers) प्रश्नावर आवाज उठवला, तर त्याच्या पाठीशी उभे राहणे मी माझं कर्तव्य समजतो. परंतु, असंवैधानिक शब्द वापरला, आमच्या नेतृत्त्वाबद्दल म्हणून आमच्याकडून तशीही कृती झाली. मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. मी लवकरच विजय घाडगे पाटलाची भेट घेऊन त्यांच्या मनातील गैरसमज दूर करेन, असे सूरज चव्हाण यांनी म्हटले.
अजित पवारांनी सूरज चव्हाणांना तातडीने बोलावून घेतलं-
युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुरज चव्हाण यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह छावा संघटनेच्या प्रतिनिधींना लातूरमध्ये काल बेदम मारहाण केली.दरम्यान या राड्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या आजच्या धाराशिव दौऱ्यातून सूरज चव्हाण यांना वगळण्यात आल्याची माहिती सूत्रांनी माझाला दिली आहे. लातूरमधील घटनेचे पडसाद धाराशिवमध्येही उमटण्याची शक्यता असल्याने सूरज चव्हाणांना दौऱ्यातून वगळण्यात आलंय आहे. तर या राड्यानंतर अजित पवारांनी सुरज चव्हाण यांना तडकाफडकी बोलावून घेतल्याची माहिती समोर येत आहे.
नेमकं काय घडलं?
महाराष्ट्राचं राजकारण आता किती रसातळाला गेलंय हे दर्शवणारी घटना काल लातूरमध्ये घडली. विधान परिषदेचं कामकाज सुरू असताना ऑनलाईन रमी खेळणाऱ्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तुफान मारहाण केली. सुरज चव्हाण यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह छावा संघटनेचे प्रतिनिधी विजय घाडगे यांना बेदम मारहाण केली. सूरज चव्हाण यांनी विजय घाडगे यांना कोपराने आणि बुक्क्यांनी मारहाण केली. सदर घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.