पुणे: धनंजय मुंडे यांच्याविरोधात ते पक्षात असतानाही माझी लढाई सुरु होती. मला कधी कधी वाटतं, बरं झालं पक्ष फुटला. कारण या सगळ्या प्रकारानंतर एकतर ते तरी पक्षात राहिले असते किंवा मी तरी पक्षात राहिले असते. जिथे हा माणूस असेल त्या पक्षात मी काम करु शकत नाही. ते पक्षात असतानाही माझी त्यांच्याविरोधात लढाई सुरु होती, असे वक्तव्य शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. सुप्रिया सुळे यांची या कार्यक्रमातील ऑफ द रेकॉर्ड भाषणाची ऑडिओ क्लीप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लीपमध्ये सुप्रिया सुळे यांनी अनेक धक्कादायक वक्तव्यं केली आहेत. 

Continues below advertisement

सुप्रिया सुळे यांनी धनंजय मुंडे यांचे थेट नाव न घेता म्हटले आहे की, जो माणूस स्वत:ची पत्नी, मुलांची आई असलेल्या महिलेच्या गाडीत बंदूक ठेवू शकतो, अशा पुरुषासोबत मी काम करु शकत नाही. मी आज याबाबत पहिल्यांदा बोलत आहे. मी विरोधी पक्षात आयुष्य काढेन पण नैतिकता सोडणार नाही. माझं घर कंत्राटाच्या पैशांवर चालत नाही, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले. बीड येथील संतोष देशमुख आणि महादेव मुंडे यांची घरी भेट एकदा तरी जाऊन या. तुम्हाला कळेल, काय परिस्थिती आहे.  महादेव मुंडेंच्या पत्नीने मला विचारलं की, टया सगळ्यात माझ्या लेकरांची काय चूक होती?' या प्रश्नावर मी काय उत्तर देणार? संतोष देशमुख यांच्या घरी गेले होते तेव्हा त्यांच्या आईने माझा हात धरला होता. आम्हाला न्याय देशील, असा शब्द दे सुप्रिया, असे त्यांनी म्हटले. मी त्यांना संतोष देशमुख यांना न्याय देण्याचा शब्द देऊन आले, असे सुप्रिया सुळे यांनी आपल्या भाषणात सांगितले.

धनंजय मुंडे हे अजित पवारांच्या पुढाकारामुळे भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना धनंजय मुंडे हे अजित पवार यांचे भक्कम पाठीराखे म्हणून ओळखले जात होते. शरद पवार यांच्याविरोधात अजितदादांनी पुकारलेल्या बंडातही धनंजय मुंडे यांची भूमिका महत्त्वाची होती. त्यांच्यावरच आता सुप्रिया सुळे यांनी थेट हल्ला चढवल्याने राजकारण तापण्याची शक्यता आहे. या सगळ्यावर आता अजितदादा गटातून काय प्रतिक्रिया येणार, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. 

Continues below advertisement

सहा महिन्यांत आणखी एका मंत्र्याची विकेट जाईल: सुप्रिया सुळे

राज्यातील महायुतीच्या कारभारावर टीका करताना सुप्रिया सुळे यांनी म्हटलेकी, शंभर दिवसात एक विकेट गेली आहे. सहा महिने थांबा आणखी एक विकेट जाणार आहे. त्या मंत्र्याचं नाव आताच जाहीर करणे योग्य ठरणार नाही. मतदारांच्या आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत. हार-जीत सुरूच असते. शंभर दिवसात एक विकेट गेली आहे. सहा महिने थांबा, आणखी एकाची विकेट जाणार आहे. त्यांचे नाव आताच जाहीर करणे योग्य नाही. परंतु जो बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो. हिम्मत असेल, तर समोर येऊ लढ. ही लढाई खूप मोठी आहे. छोट्यांना घेरण्यापेक्षा जे ‘डबल डेंजर’ आहेत, त्यांच्याशी लढण्यात मजा आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.

आणखी वाचा

'तू जास्त बोललास म्हणून मला त्रास होतोय!' धनंजय मुंडे बालाजी तांदळेवर संतापले; अंजली दमानिया यांचे गंभीर आरोप