आमचे नातेसंबंध कसे आहेत, हे आनंद परांजपे यांनी सांगण्याची गरज नाही. आम्ही नात्यांचे झेंडे घेऊन फिरत नाही अन् आमच्या घरात एक छोटं कुत्रं आहे; ते ठराविक माणसांवर भुकतं, असं म्हणत, आनंद परांजपे यांनी आपल्या औकातीत रहावे. आमचे घर सांभाळण्यास आम्ही सक्षम आहोत, अशा शब्दात शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या ज्येष्ठ भगिनी शुभांगी गर्जे-आव्हाड यांनी आनंद परांजपे यांचे वाभाडे काढले. 


अजित पवार गटाचे नेते आनंद परांजपे यांनी आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत, कोणत्याही प्रकारे राजकारणाशी सबंध नसलेल्या जितेंद्र आव्हाड यांच्या बहिणींचा उल्लेख करून "आव्हाडांनी घरातील नातेसंबंध सुदृढ करावे" असे विधान केले होते. आनंद परांजपे यांच्या या विधानाचा शुभांगी गर्जे-आव्हाड आणि ज्योती आव्हाड चांगलाच समाचार घेतला. 


शुभांगी गर्जे-आव्हाड काय म्हणाल्या?


शुभांगी गर्जे-आव्हाड म्हणाल्या की, आम्हा भावंडांचे नातेसंबंध कसे आहेत, हे परांजपे यांनी सांगणे हास्यास्पदच आहे. आनंद परांजपे हे 24 तास आमच्या घरी चकरा मारायचे, हजेरी लावायचे. या हजेरी लावणाऱ्या माणसाला आमचे नाते दिसले नसेल. सुप्रिया सुळे आणि अजित पवार हा विषय वेगळा आहे. परांजपे हे आमच्या घरात गरज नसताना शिरले आहेत. आम्ही सामान्य कुटुंबातील आहोत. आम्ही सतत सोबतच असतो. पण, भावाच्या घरात बहिणीने सतत तळ ठोकून असावे, हे मराठी संस्कृतीमध्ये कुठेच नाही. आमचे नाते काय आहे, हे आम्हाला माहित आहे, असं शुभांगी गर्जे-आव्हाड म्हणाल्या.


आमच्या वाटेला जाऊ नका-


आमच्या घरात शिरून आमचा काही संबध नसताना अशी विधाने जो माणूस करतो, त्याची मानसिकता काय आहे, हे वेगळं सांगायला नको. जी व्यक्ती आधी वडिलांच्या पुण्याईवर आणि नंतर जितेंद्र आव्हाड यांच्या  आधारावर उभी राहिली आहे. त्या व्यक्तीवर फारसे बोलू नये. आमचे संस्कार आणि शिक्षण उच्च दर्जाचे आहे. तरीही, या ठिकाणी आपण आनंद परांजपे यांना सांगू इच्छिते की, आम्ही कुणाच्या वाटेला जात नाही. त्यामुळे त्यांनी आमच्या वाटेला जाऊ नये, आपल्या औकातीत रहावे, असा निशाणा शुभांगी गर्जे -आव्हाड यांनी साधला. आनंद परांजपे हे रोज जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करतात; आता त्यांनी तुमच्या नातेसंबंधावर भाष्य केले आहे, असे पत्रकारांनी विचारले असता, त्यांना जे बोलायचे ते बोलू द्या; पण, परांजपे जेव्हा आमच्याकडून गेले तेव्हा आम्हाला आमच्या घरातील छोट्या कुत्र्याची आठवण आली. आमच्या घरातलं एक कुत्रं नेहमी ठराविक माणसांवरच भुंकायचा; तोच गेला, असे आम्हाला वाटले. यावरून आमच्या  लक्षात येतेय की आम्ही काय सांभाळले? , असे शुभांगी गर्जे-आव्हाड म्हणाल्या.  


...तर त्याची किव येते- ज्योती आव्हाड


आम्ही राजकारणाशी संबंधित नाहीत. आम्ही आमचा व्यवसायात व्यस्त आहोत. पण, ज्या माणसाला ज्या कुटुंबाने सन्मान दिला. तोच माणूस त्या कुटुंबावर अशी टीका करीत असेल तर त्याची किव येते, अशी टीका ज्योती आव्हाड यांनी केली. दरम्यान आनंद परांजपे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करण्याची सुपारी घेतली आहे. ज्या माणसाने अजित पवारांच्या प्रतिमेला चपलेने मारण्याचे आदेश दिले होते. तो माणूस काय असेल, हे न सांगितलेले बरे, असे महिला जिल्हाध्यक्षा सुजाताताई घाग म्हणाल्या.