घाटकोपर पूर्व विधानसभेतील मनसेचे पदाधिकारी संतोष पिंगळे, सुनिल भोस्तेकर, सतिश पवार आणि राहुल चोरगे यांनी काल (9 डिसेंबर) मातोश्री येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेंनी त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी विभाग क्रमांक 8 चे विभागप्रमुख तुकाराम (सुरेश) पाटील तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.






उद्धव ठाकरे काय म्हणाले?


नुकताच विधानसभेचा निकाल लागला. तो लागल्यानंतरही तुम्ही शिवसेनेत येतायत. नुसते येत नाहीत तर जल्लोषात येताय, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच मुंबई ओरबाडून नेली जात असताना आपण बघत बसणार का?, असा सवाल उपस्थित करत पराभव ज्याच्या जिव्हारी लागतो. तोच उद्याचा इतिहास घडवू शकतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तुम्ही कुठल्या पक्षातून आलात त्याबद्दल मला काही बोलायचं नाही. पण पक्ष स्थापन केल्यानंतर एक काहीतरी हेतू लागतो, दिशा लागते. ती अजिबातच त्या पक्षात नाही. अशावेळी तुमच्यासारखे कार्यकर्ते तिथे मरमर मेहनत करतात, त्या मेहनतीला काही अर्थ राहात नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नाव न घेता मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीका केली. 


उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना-


उद्धव ठाकरेंनी माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी मातोक्षीवर बैठक बोलावली होती. या बैठकीत पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांना सूचना देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मुंबई महापालिका निवडणुकीपर्यंत भाजप शिंदेना गोंजारेल, निवडणुकीत हेतू साध्य झाल्यानंतर भाजप जे करायचेय ते शिंदेंच्या बाबतीत करतील. आरएसएसचा आव आणून त्याखाली भाजपने वेगवेगळ्या यंत्रणा राबवल्या. आरएसएस पत्रक वाटाण्यापुरती होती. सध्या सुरु असलेल्या सत्ता स्थापनेत शिंदेंच्या मागे दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती आहे. पण आपण मुंबई महापालिका जिंकायाचीच आहे. उद्धव ठाकरेंकडून लवकरच राज्यातील पदाधिकाऱ्यांचे शिबिर बोलावण्यात येणार असल्याची माहिती आहे. तसेच मुंबईतील गटप्रमुखांचेही शिबिर घेण्यात येणार आहे.