मुंबई : रोहित पवार (Rohit Pawar) हे माझ्या लायकीचे नेते नाहीत, ते ग्ल्लीबोळातील नेते असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी केली. तसेच विजय वडेट्टीवार काँग्रेसमध्ये नाराज असून ते लवकरच भाजप पक्षामध्ये जातील असा दावाही त्यांनी केला.
राष्ट्रवादीचे अजित पवार पक्षातील काही आमदार शरद पवारांच्या पक्षात येणार असल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी केला होता. तसेच अजित पवार गटाला भाजपने एकही मंत्रिपद दिलं नसून त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवावी लागेल असा दावा रोहित पवारांनी केला होता. त्यावर आता अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
अमोल मिटकरी म्हणाले की, केंद्रातील मंत्रिपदाबाबत जे काही बोलायचं आहे ते अजितदादा बोलतील. रोहित पवार हे गल्लीबोळातले नेते आहेत, ते माझ्या लायकीचे नाहीत.
विजय वडेट्टीवार काँग्रेस सोडणार
विजय वडेट्टीवार हे काँग्रेसमध्ये नाराज असून ते लवकरच भाजपमध्ये जातील असा दावा अमोल मिटकरी यांनी केला. नाना पटोले यांचं वर्चस्व त्यांना सहन होत नाही, त्यामुळे ते काँग्रेस सोडतील असं अमोल मिटकरी यांनी सांगितलं.
अमोल मिटकरी यांच्या दाव्यानंतर काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकुर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, अमोल मिटकरी यांना विचारून विजय वडेट्टीवार निर्णय घेतील असं वाटत नाही. ते आजही काँग्रेस सोबत आहेत, उद्याही सोबत राहतील. अमोल मिटकरी यांनी त्यांच्या पक्षाचं पाहावं, आमच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही असंही त्या म्हणाल्या.
अजित पवारांचे आमदार शरद पवारांच्या संपर्कात, रोहित पवारांचा दावा
एकीकडे शिंदेंच्या आमदारांवरुन दावे-प्रतिदावे सुरु आहेत, तर दुसरीकडे लोकसभेच्या निकालापासूनच अजित पवारांसोबतचे काही आमदार शरद पवाराकडे परतणार अशा चर्चा सुरु होत्या. त्यातच शरद पवारांच्या पक्षांतील वरिष्ठांनी आमदारांच्या घरवापसीवरुन दावेही केले. आमदार रोहित पवारांनी त्यावर एक सूचक वक्तव्य केलं. विधानसभेचं तिकीट देताना काही अवघड निर्णय घ्यावे लागतील. आमदार परत येत असतील तर स्वागत करण्यास हरकत नाही असं म्हणत रोहित पवारांनी घरवापसीचे संकेत दिले.
रोहित पवारांना अमोल मिटकरींचं प्रत्युत्तर
रोहित पवारांच्या या वक्तव्याला अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हमाले की, तुतारी गटाचे तीन आमदार आमच्या संपर्कात आहेत. पावसाळी अधिवेशनात अर्थसंकल्प सादर होण्याआधी मतदारसंघातली कामं करून घेण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीतले दोन आमदार आमच्यासह येणार आहेत. त्यामुळे हवेत गोळीबार करणाऱ्या तुतारी गटाच्या नेत्याला लवकरच गुड न्यूज मिळेल.
ही बातमी वाचा: