अहिल्यानगर: जिल्ह्यातील संगमनेर येथे काल रात्री शिवसेना आमदार अमोल खताळ यांच्या कानशिलात लगावल्याने वातावरण तणावग्रस्त झाले होते. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत तेथील परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, आज श्रीगोंदा (ahilyanagar) येथे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit pawar) दिशेने कांद्याची माळ फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी, पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं असून ते संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे तत्कालीन युवक अध्यक्ष सूरज चव्हाण यांच्याकडून लातूरमध्ये संभाजी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षांना मारहाण करण्यात आली होती. त्यामुळे, संभाजी ब्रिगेडचे समर्थक अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर संतापले आहेत.
श्रीगोंदा येथे शेतकरी मेळाव्यात बोलतांना अजित पवारांना कांद्यावर बोलण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र,अजित पवारांचे भाषण सुरू असताना काही कार्यकर्ते हातात कांद्याची माळ घेऊन आले होते. त्यावेळी, एका कार्यकर्त्याने हातातील माळ गरागरा फिरवत अजित पवारांकडे फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेळीच तेथील एकाने संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यास रोखले. त्यानंतर, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे आणि तालुका अध्यक्ष नाना शिंदे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संभाजी ब्रिगेडच्या समर्थकांकडून कांद्याचे दरासंदर्भात अजित पवारांना बोलण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र, कांद्यासंदर्भात अजित पवारांनी आपल्या भाषणात शब्दही न बोलल्याने भाषणाच्या शेवटी अजित पवारांकडे कांद्याची माळ फेकण्याचा प्रयत्न केला गेला. दरम्यान, कांद्याचे दर घसरल्याने शेतकऱ्यांचे व कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे, कांद्याच्या दरावर सरकारने काहीतरी मार्ग काढावा, अशी भूमिका संभाजी ब्रिगेडने घेतली आहे.
संगमनेरमध्ये राजकीय तणाव
दरम्यान, गुरुवारी रात्री संगमनेर येथे आमदार अमोल खताळ यांना श्रीमुखात लगावल्याची घटना घडली होती. त्यामुळे, संगमनेर येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संगमनेर येथे शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांची सभा झाल्यानंतर तेथील राजकीय वातावरण तापलं असून त्यातच चक्क आमदाराला मारहाण झाल्याची घटना घडल्याने पोलिसांनीही मोठा बंदोबस्त तैनात केला होता.
हेही वाचा
मनोज जरांगे आझाद मैदानात, आंदोलक जोमात; गुणरत्न सदावर्तेंच्या घराखाली पोलीस बंदोबस्त तैनात