पुणे : राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेटवचा दिवस आहे. त्याच पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या स्थानिक पातळीवर युती आणि आघाड्या होत आहेत. मात्र, त्यामध्ये, महायुतीतील पक्ष महाविकास आघाडीतील पक्षासोबत तर महाविकास आघाडीतील पक्षही महायुतीतील पक्षासोबत एकत्र येत असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे शिवसेना (Shivsena) पक्षात दोन गट पडल्यानंतर मोठा राजकीय वाद निर्माण झाला. त्यामुळे, रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना आणि शिवसेना युबीटी एकत्र न येण्याचे आदेशच पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) दिले होते. मात्र, पुण्यातील चाकणमध्ये शिवसेना पक्षाची ही वेगळीच युती पाहायला मिळाली. त्यावरुन, भाष्य करताना राष्ट्रवादीचे (NCP) आमदार दिलीप मोहिते यांनी दोन्ही शिवसेना एकच असल्याचा आरोप केला आहे.
नगरपालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत पुण्याच्या चाकणमध्ये ठाकरे आणि शिंदे यांची शिवसेना एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. चाकण नगरपरिषदेसाठी शिंदेच्या शिवसेना नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मनीषा सुरेश गोरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिंदेच्या शिवसेनेचे जुन्नरचे आमदार शरद सोनवणे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे खेड आळंदीचे स्थानिक आमदार बाबाजी काळे उपस्थित होते. मात्र, ज्यांच्या विरोधात हे एकवटलेत त्या खेड आळंदी विधानसभेच्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप मोहिते यांनी शिवसेनेच्या एकीवरती सडकून टीका केली. शिंदे सेनेतील नेत्यांची काही मुलं ठाकरे सेनेत आहेत, तर ठाकरेंकडील काही नेत्यांची मुलं शिंदेंच्या शिवसेनेत आहेत. विधानसभेपासून हे दोन्ही नेते एकत्र असल्याचं सांगत, विधानसभेला शिंदेच्या शिवसेनेने महाविकास आघाडीलाच मदत केल्याचंही दिलीप मोहिते यांनी म्हटलं.
हा निर्णय केवळ नगराध्यक्षापुरता - काळे
खेड-आळंदीचे दिवंगत आमदार सुरेश गोरेंच्या पश्चात ही पहिली निवडणूक पार पडत आहे. त्यांच्या पत्नी चाकण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी उभ्या राहिल्या आहेत. अशा प्रसंगी राजकारण बाजूला ठेऊन, दिवंगत आमदार गोरेंना आदरांजली म्हणून आम्ही केवळ नगराध्यक्ष पदासाठी मनीषा गोरेंना पाठिंबा दिला आहे, त्यामुळे ही युती म्हणता येणार नाही, असे शिवसेना आमदार बाबाजी काळे यांनी म्हटले. उद्धव ठाकरे असो वा संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याच्या सूचना दिल्यात. त्यामुळ हा निर्णय चाकण नगराध्यक्ष पदापुरता मर्यादित असेल. तालुक्यातील राजगुरुनगर आणि आळंदीत आम्ही स्वबळावर लढतोय, असे बाबाजी काळे यांनी सांगितले.
इंदापूर राष्ट्रवादीत बंडखोरी
इंदापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी इंदापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत बंड केल आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने घड्याळाच्या चिन्हावरती भरत शहा यांना उमेदवारी दिल्याने नगराध्यक्ष पदासाठी प्रदीप गारटकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी दाखल करण्यापूर्वी इंदापूर शहरातून हजारोंच्या संख्येत पदयात्रा काढीत शक्ती प्रदर्शन करण्यात आलं आहे. शरद पवार गटाचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील भाजपचे नेते प्रवीण माने आणि प्रदीप गारटकर या तिघांनी स्थानिक पातळीवर एकत्र येत कृष्णा भीमा विकास आघाडी करत आता थेट राष्ट्रवादीचे नेते कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत.
हेही वाचा