नागपूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तीन आठवड्यांनी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) रविवारी झाला. यात 33 कॅबिनेट मंत्री आणि 6 राज्यमंत्र्यांना शपथ देण्यात आली. मात्र मंत्रिमंडळातील एक पद रिक्त आहे. हे मंत्रिपद कोणासाठी रिक्त ठेवण्यात आले? असा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी याबाबत केलेल्या विधानावरून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.  


काही दिवसापूर्वी झालेल्या विशेष अधिवेशनात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी 'योग्य वेळी, योग्य निर्णय' असं वक्तव्य केले होते. यानंतर जयंत पाटील हे अजित पवार यांच्यासोबत जाणार का? अशा चर्चा रंगत आहे. आता यावरून अमोल मिटकरी यांनी मोठं भाष्य केले आहे. मंत्रीमंडळातील एक जागा जयंत पाटील यांच्यासाठीच राखीव असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. 


ते योग्य वेळी योग्य निर्णय घेतील : अमोल मिटकरी


आजपासून नागपूरमध्ये विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. आज अमोल मिटकरी यांनी माध्यमांसोबत संवाद जयंत पाटील यांच्याबाबत मोठं भाष्य केलंय. अमोल मिटकरी म्हणाले की, मागे एक मंत्रिपद त्यांच्यासाठी खाली ठेवलं होतं. मात्र लोकसभेत चांगलं यश मिळालं आणि ते आले नाही. आता एक जागा राखीव ठेवली आहे ती वन डाऊनसाठी ठेवली आहे. मला जेवढी माहिती आहे, ते लवकरच आमच्यात येतील. योग्य वेळी योग्य निर्णय ते घेतील. मंत्रीमंडळातील एक जागा त्यांच्यासाठीच राखीव आहे, असे त्यांनी म्हटले. 


भुजबळ राज्यसभेवर जाणार : अमोल मिटकरी


तर मंत्रीमंडळातून डच्चू मिळाल्यानंतर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नाराज असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मी नाराज असल्याचे भाष्य केले आहे. तर शिवसेना शिंदे गटाचे दीपक केसरकर, तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार हे देखील नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याबाबत अमोल मिटकरी यांना विचारले असता ते म्हणाले की, भुजबळ नसल्याने ओबीसी बांधव नाराज असल्याचं दिसलं. मात्र भुजबळ हे राज्यसभेवर जाणार आहेत.  मुनगंटीवार, केसरकर यांना शपथ घेता आली नाही. तिन्ही पक्षातील नाराजांसोबत बोलतील. नाराजीपेक्षा विदर्भातील शेतकऱ्यांवर फोकस झालं पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.  



आणखी वाचा 


Maharashtra Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्तारात सांगलीकरांच्या पदरी निराशा, बड्या नेत्याच्या प्रतीक्षेमुळे महायुतीने एक मंत्रिपद ठेवलं राखून?