मुंबई : राज्यातील महापालिका निवडणुकांच्या (Election) पार्श्वभूमीवर प्रमुख राजकीय पक्षांच्या बदल्या भूमिका पाहायला मिळत आहेत. मुंबई महापालिका ठाकरेंच्या ताब्यात ठेवण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यासाठी, उद्याच दुपारी 12 वाजता अधिकृतपणे ठाकरे बंधूंच्या म्हणजेच मनसे-शिवसेना युतीची घोषणा होणार आहे. त्यानंतर, आता पवारांच्या दोन्ही राष्ट्रवादी देखील एकत्र येणार असल्याचं निश्चित झालं आहे. मुंबईतसाठी ठाकरे तर पुण्यासाठी (Pune) पवार एकत्र आल्याचं महापालिका निवडणुकांमुळे पाहायला मिळालं. ठाकरेंनंतर पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र येणार असून 26 डिसेंबर रोजी याची घोषणा होणार असल्याची माहिती स्वत: अजित पवारांनी (Ajit pawar) दिली. 

Continues below advertisement

अजित पवार 26 तारखेला दोन्ही राष्ट्रवादीच्या अधिकृत युतीची घोषणा करणार आहेत, कार्यकर्त्यांना बोलताना अजित पवारांनी 26 तारखेला अधिकृत घोषणा करू असं सांगितलं. तसेच, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका,  26 तारखेला सगळ्या गोष्टी समोर येतील. कोण काय बोलतं यावर विश्वास ठेवू नका, असेही अजित पवारांनी कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटले. यासंदर्भाने उद्या अजित पवार मुंबईत आढावा घेणार आहेत. दरम्यान, दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेनंतर शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या तर मी पक्षातून राजीनामा देईन, असा इशारा दिला होता. मात्र, प्रशांत जगताप यांच्या या इशाऱ्याने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला फारसा फरक पडलेला दिसत नाही.

एकत्र येण्यासाठी राष्ट्रवादीचा प्रस्ताव

पुण्यात भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्व पक्षांच्या आघाडीचा प्रस्ताव तयार केला जाणार आहे. त्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी हातमिळवणी करून ठाकरेंच्या शिवसेनेलाही सोबत घेणार असल्याची चर्चा सुरु आहे. अजित पवारांना याबाबत प्रस्ताव दिला जाणार असल्याची माहिती शशिकांत शिंदे यांनी दिली. त्यामुळे शशिकांत शिंदेंचा प्रस्ताव अजित पवार स्वीकारणार की नाही?, याकडे आता महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. तसेच या प्रस्तावामुळे पुण्यात अजित पवार महाविकास आघाडीसोबत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, पुणे महानगरपालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार आहेत. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडीच्या 25 किंवा 26 तारखेला घोषणा केली जाणार आहे, अशी माहिती अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनीही दिली आहे. 

Continues below advertisement

राष्ट्रवादीकडून हालचालींना वेग

प्रशांत जगताप यांच्या इशाऱ्यानंतर पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीतील नेत्यांची एक गुप्त बैठक सुरु आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या हालचालींना वेग आला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अंकुश काकडे, विशाल तांबे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुभाष जगताप आणि सुनील टिंगरे उपस्थित आहेत. दोन्ही पक्षातील स्थानिक नेत्यांच्या बैठकीनंतर वरिष्ठ नेत्यांना माहिती पाठवली जाणार आहे. आजच्या बैठकीत पुणे महानगरपालिका निवडणूक आणि इतर मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा

मोठी बातमी! ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या दुपारी 12 वाजता घोषणा; मुंबईचं जागावाटपही निश्चित, मनपासाठी ठाकरे एकत्र