Beed: बीड नगर परिषदेत भाजपाचा नगराध्यक्ष पदासाठी निसटता पराभव झाला. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार प्रेमलता पारवे यांचा साडेतीन हजाराने विजय झाला. मात्र आता उपनगराध्यक्ष पद मिळवण्यासाठी अजित दादांच्या राष्ट्रवादीसह भाजपाची संख्याबळाची जुळवाजुळव सुरू झालीय. अशातच भाजप नेत्या सारिका क्षीरसागर यांनी 'बीड क्षीरसागर मुक्त होत नाही. माझे दीर (संदीप क्षीरसागर) त्यांचे देखील नगरसेवक सोबत आहेत.' असं म्हणत भाजप आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत.
तर यावर प्रतिक्रिया देत आमदार विजयसिंह पंडित यांनी ते दोघेही पहिल्यापासून एकत्रच असल्याच सांगितले. विचारधारा आपल्या सोयीने बदलणारी ही लोकं आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने क्षीरसागरांच्या तीन पिढ्यांना ताकद देऊन सत्तेत ठेवले . भूमिका बदलणाऱ्या या लोकांना बीडकर कधीच स्वीकारणार नाहीत. यांना हद्दपार करून बीडमध्ये घड्याळाचा गजर होईल आणि तो क्षीरसागर व्यतिरिक्त असेल असं विजयसिंह पंडित यांनी ठाम सांगितलं.दरम्यान या राजकीय चर्चेबाबत बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
बीडमध्ये दादांचा सगळ्यांनाच धक्का
एकीकडे बीड नगरपालिकेत क्षीरसागर घराण्याची सत्ता संपुष्टात आल्याचं बोललं जात आहे. अजित पवारांचा राष्ट्रवादीने नगराध्यक्षपद दिल्याने बीडच्या मतदारांनी अजित पवारांचा राष्ट्रवादीला कौल दिल्याची चर्चा आहे. बीड नगरपालिकेवर गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस सोबत असलेल्या क्षीरसागर घराण्याची सत्ता आहे. आमदार संदीप क्षीरसागर हे शरद पवारांसोबत गेले तर योगेश क्षीरसागर ऐनवेळी भाजपमध्ये गेले. त्यांच्या मागे पंकजा मुंडे यांनी पूर्ण ताकद लावली. तर दादांचा राष्ट्रवादीची जबाबदारी गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांच्यावर सोपवण्यात आली होती. राष्ट्रवादीच्या प्रेमलता पारवे यांनी भाजपच्या ज्योती घुमरे यांचा पराभव केल्यानंतर क्षीरसागर बंधूंना मोठा धक्का बसल्याचे मानलं जात आहे.
गेवराईमध्ये विजयसिंह पंडितांना धक्का
बीडच्या गेवराईमध्ये राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार विजयसिंह पंडित, माजी आमदार अमरसिंह पंडित यांना मोठा धक्का बसला. माजी आमदार लक्ष्मण पवार यांनी गेवराई नगर परिषदेतील 15 वर्षांची सत्ता कायम राखली. गेवराईत भाजपचा विजय झाला. नगराध्यक्षपदी उमेदवार गीता पवार यांना मतदारांनी निवडून आणलं.