Navneet Rana In Byculla Jail: खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. दोघांनाही वांद्रे न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती, मात्र कोरोना चाचणीमुळे तुरुंगात रवानगी होण्यास विलंब झाला. मात्र आता दोघांचेही रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. नवनीत राणा यांना भायखळा तुरुंगात नेण्यात आले आहे. नवनीत राणासोबत पोलिसांची तीन वाहने कारागृहात पोहोचली. यामध्येच आता नवनीत राणा यांची तब्येत खालावली असल्याची माहिती समोर येत आहे. सध्या त्या भायखला कारागृहाच्या रुग्णालयात दाखल असल्याची माहीती आहे. थोड्याच वेळात त्यांना दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जाण्याची शक्यता आहे.


याच दरम्यान रवी राणा यांना घेऊन पोलीस  आर्थर रोड कारागृहात पोहोचले, मात्र कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर रवी राणाला नवी मुंबईतील तळोजा कारागृहात नेले जात आहे. आर्थर रोड कारागृहात एकूण 800 कैद्यांची क्षमता आहे. मात्र सध्या आर्थर रोड कारागृहात 3600 हून अधिक कैदी आहेत. 


या दोघांनाही पोलीस ठाण्यातून कारागृहात नेत असताना कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कारण याप्रकरणी शिवसेनेचे कार्यकर्ते सातत्याने निदर्शने करत आहेत. यासोबतच खासदारांच्या वकिलाने नवनीत राणा यांच्या जीवालाही धोका असल्याचे म्हटले आहे. अशा परिस्थिती पोलिसांना कोणताही प्रकारचा धोका पत्करायचा नव्हता.


दरम्यान, नवनीत राणा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'बाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्याची घोषणा केली होती. त्यांच्या या घोषणेनंतर शिवसेना समर्थक चांगलेच संतप्त झाले आणि त्यांनी राणा यांच्या खार येथील घराबाहेर जोरदार निदर्शने केली. याच्या काही वेळानंतर खासदार नवनीत राणा यांनी पंतप्रधान मुंबईत येत असल्याने आपण मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्यासाठी जाणार नसल्याचे सांगितले होते. यानंतर पोलिसांनी नवनीत राणा आणि त्याचे पती रवी राणा यांना अटक केली. आज त्यांना न्यायालयासमोर हजार केले असताना त्यांना न्यायालयाने 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.