मुंबई : लोकसभा निवडणुकीत चुरशीच्या आणि लक्षवेधी ठरलेल्या अमरावती (Amravati) लोकसभा मतदारसंघात नवनीत राणा (Navneet Rana) यांचा जवळपास 28 हजार मतांनी पराभव झाला. येथील मतदारसंघातून काँग्रेसचे बळवंत वानखेडे विजयी झाले आहेत. त्यामुळे, राणा दाम्पत्यास पराभवाचा मोठा धक्का जनतेने दिला आहे. या निवडणुकीतील पराभवानंतर नवनीत राणा यांनी सविस्तर प्रतिक्रिया देणं टाळलं होतं, आज तब्बल 23 दिवसांनी नवनीत राणा यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना अमवरावतीमधील पराभव स्थानिक राजकारण आणि आगामी निवडणुकांसाठीची तयारी यासंदर्भात भाष्य केलं. 


लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर नवनीत राणा पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना भेटल्या आहेत. लोकसभा झाल्यानंतर आम्ही भेटलो नव्हतो, आमची भेट झाली नव्हती म्हणून आज भेटायला आले होते. लोकसभा निवडणूक कशाप्रकारे झाली, त्या संदर्भात आजच्या बैठकीत बोलणं झालं, अशी माहिती नवनीत राणा यांनी दिली. तसेच, मी भाजपची कार्यकर्ता म्हणून काम करणार असून यापुढे पक्षाचं काम करण्याची पद्धत आणि आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये कसं काम करायचं, कुठली जबाबदारी पार पाडायची, याबाबतही आजच्या बैठकीत चर्चा झाली. पार्टीचा पट्टा जेव्हा गळ्यात घातला, त्यांच्यासोबत नक्कीच मी इमानदार राहणार, अशा शब्दात आपण भाजपातच राहणार असल्याचे राणा यांनी म्हटले. 


23 दिवसांनी फडणवीसांची भेट


मला असं वाटतं मी पार्टीची कार्यकर्ता आहे, निवडणुकीत कशामुळे माझ्या जनतेने मला अमरावतीमध्ये थांबवलं हे सांगणं माझं कर्तव्य आहे. देवेंद्र फडणवीसांना ते सांगणे खूप आवश्यक होतं आणि कुठे काय झालं. माझ्याकडून काय चूक झाली, याबाबत चर्चा केली. देवेंद्र फडवणीस माझे नेते आहेत, त्यांना भेटून त्यांच्यासोबत चर्चा करुन बरं वाटलं. निकालानंतर 23 दिवसांनी मी त्यांना भेटले, असेही राणांनी म्हटले.  


आमदार बच्चू कडू यांच्याबद्दल प्रश्न विचारला असता, मी काही बोलणार नाही, असे राणा यांनी म्हटले. ''मला असं वाटतंय मी कोणावर काही बोलणार नाही, मी माझं काम जनतेसाठी करते, कोणत्या नेत्यासाठी करत नाही. माझ्या जिल्ह्यामध्ये जे काही घडलं, माझं इलेक्शन मी लोकांच्या भरोशावर लढले आहे. मी दुसऱ्या कोणाच्या भरोशावर निवडणूक लढली नाही. निवडणुकीत माझे नेते अमित शहा, देवेंद्रजी आणि मोदीजी माझ्यासोबत होते, ते सर्व जनतेला माहिती आहे,'' अशी प्रतिक्रिया नवनीत राणा यांनी दिली. 


आयुष्यभर मनात खंत


महायुतीचा धर्म पाळला गेला नाही, यावर मी काहीच भाष्य करणार नाही. माझे जे नेते आहेत ते त्याच्यावर भाष्य करतील. पण, मी माझं कर्तव्य इमानदारीने पार पाडलं आहे. मी मोदीजींना अमरावतीमधून जागा देऊ शकले नाही, ती खंत आयुष्यभर माझ्या मनात राहणार आहे. यापुढे पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काम करणार, इमानदारीने मैदानात उतरणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्त आमच्यात आहे.  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन आम्ही या मैदानात आहोत. जोश कधी कमी होतो असं मला वाटत नाही, जो इमानदार आहे तो फक्त लढणं जाणतो, असेही राणांनी म्हटले. 


यशोमती ठाकूर यांना टोला


मी जे करते ते ओरिजनल आहे, आता ब्रँडला कॉपी करणारे खूप सारे कॉपी घेऊन जातात. पण, ब्रँड हा ब्रँड असतो, असे म्हणत यशोमती ठाकूर यांना टोला लगावला. माझा कोणासोबतही सामना नाही, मी माझ्या जनतेची सेवा करण्यासाठी या क्षेत्रात आली आहे. ती सेवा मी शेवटच्या श्वासापर्यंत करणार, असेही राणांनी म्हटले. 


विधानसभा उमेदवारांसाठी काम करणार


मी देशाच्या पातळीवर जाऊन काम करते, 100% कार्यकर्ता म्हणून जिथे जिथे माझी गरज पडेल, जिथे मला वाटेल की पक्षाला जाऊन आपण मदत करू शकतो, मी तिथे जाऊन विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांसाठी नक्की करणार, असेही राणांनी सांगितले. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परत महायुतीचे सरकार येणार, यात कोणतीही शंका नाही. काही लोक बोलत असतात ते फक्त ऐकण्यासाठी असते. पण, या राज्यामध्ये खरं कोणी काम करत असेल, गोरगरिबांना न्याय देऊ शकते, शेतकऱ्यांना न्याय देऊ शकते, ते फक्त महायुती आणि देवेंद्र फडणवीस हेच देऊ शकतात, अशा शब्दात महायुतीच सरकार पुन्हा येईल, असा विश्वास राणा यांनी व्यक्त केला. 


मतदार याद्यांच्या घोळामुळे राणांचा पराभव


अमरावती लोकसभा निवडणुकीच्या मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाला असून अनेकांची नावे यादीतून गहाळ झाल्याचा आरोप भाजपचे आमदार प्रवीण पोटे यांनी केला आहे. त्यामुळे भाजपच्या उमेदवार नवनीत राणा ह्या पराभूत झाल्याचा दावा देखील त्यांनी यावेळी केला. अमरावती शहरातील साधारणत: 35 हजार आणि अमरावती लोकसभा मतदारसंघातील 1 लाख नावे यादीतून गहाळ झाली आहे. त्यामुळे मतदार यादीची तपासणी करावी आणि त्या यादीची दुरुस्ती करावी, या मागणीसह आज आमदार प्रवीण पोटे यांच्या नेतृत्वात भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.