चंद्रपूर: राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर यांनी प्रत्येक गोष्टीत कमिशन खाल्लं, जलयुक्त शिवार योजना असो वा घरकुल योजना, सगळ्यांना विरोध केला अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) केली. जिथे सत्ता मिळेल तिथे मलाई खाऊ अशी काँग्रेसची भूमिका असून त्यांनी देश तोडला अशी टीकाही त्यांनी केली. चंद्रपुरात भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या प्रचाराचा नारळ मोदींच्या हस्ते फोडण्यात आला. 


नरेंद्र मोदी म्हणाले की,  चंद्रपूरमधून एवढे प्रेम मिळणे माझ्यासाठी विशेष आहे. याच चंद्रपुरातून राम मंदिरासाठी काष्ठ पाठवण्यात आलं. नव्या संसदीय भवनमध्ये ही चंद्रपूरचे काष्ठ लावले आहे. त्यामुळे चंद्रपूरची ख्याती संपूर्ण देशात आहे. 


कमिशनसाठी अनेक योजनांना विरोध केला


एकीकडे भाजप आणि एनडीए आहे, देशासाठी ठोस, मोठे निर्णय घेण्याचे काम आम्ही करतो. दुसरीकडे काँग्रेस आहे, जिथे सत्ता मिळेल तिथे मलाई खाऊ अशी त्यांची भूमिका आहे असा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला. ते म्हणाले की, एक स्थिर सरकार किती गरजेचे आहे हे महाराष्ट्राशिवाय कुणाला माहिती आहे. इंडी अलायन्सची जोपर्यंत देशात सत्ता होती, तोपर्यंत त्यांनी महाराष्ट्राची उपेक्षा केली. जनादेश नाकारत राज्याच्या सत्तेत पोहचले तेव्हा त्यांनी स्वतः चा आणि परिवाराचा विकास केला. 


प्रत्येक गोष्टीत मलई खाल्ली


कुणाचे कंत्राट कुणाला मिळणार, कुणाच्या खात्यात किती येणार यामध्ये महाराष्ट्राचे भविष्य खराब केले. कुठलाही प्रकल्प असो, कमिशन द्या नाहीतर कामाला ब्रेक लावा, हेच सुरु होते. यांनी जलयुक्त शिवार योजना बंद केली, सिंचन प्रकल्प बंद केला. विदर्भ विकासासाठी मी समृद्धी महामार्ग लोकार्पण केले, त्याचाही काँग्रेसने विरोध केला होता. मराठवाड्यासाठी असणारी वॉटर ग्रीड योजना बंद केली. मुंबई मेट्रो, रिफायनरी बंद केली. गरिबांना घरे देणारी योजना ठप्प पाडली असा आरोप मोदींनी केला. 


आमच्या सरकारने या सगळ्या योजना पुन्हा सुरू केल्या असं सांगत मोदी म्हणाले की, राज्यात शिंदे-फडणवीस-पवारांचं सरकार रात्रंदिन काम करतंय. लोक मोदी सरकारला आपलं सरकार मानतात. मोदी गरीब परिवारात जन्माला येऊन देशाचा प्रधानमंत्री झाला आहे. 


काँग्रेसवर प्रश्नांची सरबत्ती


देशाचं विभाजन कुणी केलं? काश्मीरचा प्रश्न कुणी प्रलंबित ठेवला? आतंकवाद कुणामुळे निर्माण झाला? बाबासाहेबांना भारतरत्न पुरस्कारापासून वंचित कोण ठेवलं? असे अनेक प्रश्न नरेंद्र मोदींनी विचारले. ते म्हणाले की, आमचं सरकार सत्तेत आल्यानंतर महाराष्ट्रातच नाही तर देशभरात नक्षलवाद कमजोर पडला आहे. गडचिरोली आता पोलादाचं शहर म्हणून ओळखला जातं. कडू कारलं साखरात घोळा किंवा तुपात तळा, ते कडूच राहणार


नकली शिवसेनेवाले हे हिंदुत्वाला शिव्या देणाऱ्या डीएकमेवाल्यांना महाराष्ट्रात आणून रॅली करतात असं सांगत मोदींनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.