मुंबई : राजधानी मुंबईत सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईकरांची (Mumbai) दाणादाण उडवली होती. मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीवरही त्याचा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. शहरातील भुयारी मेट्रो स्टेशनमध्ये पाणीच पाणी झाल्याने काही दिवसांपूर्वीच उद्घाटन झालेल्या मेट्रोचे स्थानकाचे धिंदवडे निघाले होते. त्यानंतर, शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मेट्रो स्टेशनची पाहणी केल्यानंतर भाजप आणि महायुती सरकारवर थेट निशाणा साधला. तर, आज पत्रकार परिषदेतून पुन्हा एकदा भाजपला लक्ष्य केलं आहे. नगरसेवकांना फोडण्यासाठी वापरला जाणारा पैसा हा मुंबईकरांचे आज जे हाल झाले त्यातून काढलेला असल्याचे आदित्य यांनी म्हटले होते. तसेच, केंद्रातील भाजप नेत्यांवरही आदित्य यांनी हल्लाबोल केला. त्यावरुन, आता माजी मंत्री आणि खासदार नारायण राणे (Narayan rane) यांनी आदित्य ठाकरेंना थेट इशारा दिला आहे. आदित्य ठाकरे,  तू मोदी, शाह, फडणवीस यांची नावं घेतलीस तर याद राख, अशा शब्दात नारायण राणेंनी ठाकरेंचना दम भरला.  

नारायण राणेंनी आज पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तर, खासदार संजय राऊत यांनाही एकप्रकारे इशाराच दिला आहे. मुंबईतील पावसाची आठवण सांगताना नारायणे राणेंनी 26 जुलै 2005 ची घटना सांगितली. काल मुंबईत अतिवृष्टी झाली, विरोधकांमध्ये हाहाकार उडाला आहे. पत्रकारांना बिझी केले आहे, 26 मे रोजी 252 मिमी पाऊस मुंबईत पडला. पण, आदित्य, उद्धव ठाकरे यांना एक आठवण करून देतो. 26 जुलै 2005 ला 944 मिमी पाऊस मुंबईत पडला होता. त्यावेळी, 27 तारखेला उद्धव ठाकरेंचा वाढदिवस होता, त्यांची राजवट असताना पडला, तरी मुंबई बुडाली नव्हती, असे नारायण राणेंनी म्हटलं. 

नारायण राणेंचे ठाकरेंना सवाल

अनेकवेळा ते मागील काळातील फोटो दाखवतात हे मी पाहिले आहे. हिंदमाताचे फोटो दाखवले जातात. आदित्य ठाकरे काल बोलला, आज प्रेस झाली. पण, 2005 साली महापालिकेत कुणाची सत्ता होती, मिठी नदी नव्हती का,आता आली का? तेव्हा साफ केली होती का? तरी पण पाणी का भरले? वस्त्यांमध्ये पाणी का गेले? किती वय होते तुझे, आठवण कर, काहीही बोलतो. कमाईचे साधन निर्माण करण्यासाठी काहीही बोलतो, असे सवाल नारायण राणेंनी उपस्थित केले आहेत. सन 1985 साली मी नगरसेवक झालो, मी बेस्ट चेअरमन झालो, तेव्हा पालिकेत काय चालले होते, तू नव्हता, मी होतो. टक्केवारी किती असायची, संजय राऊत आहे ना बडबड करतो, तो शिवसेनेत नाहीतर लोकप्रभामध्ये होता. बाळासाहेबांविरुद्ध बोलायचा, तो संपादक म्हणून आला, शिवसेनेत प्रवेश केला नाही, कपडे उतरवेल बोलला. आता, सकाळी उठला की प्रेसकडे धावतो, असे म्हणत नारायण राणेंनी संजय राऊतांवरही टीका केली. 

तुमच्या उत्पन्नाचे साधन काय?

भ्रष्टाचार हा उद्धव व आदित्यच्या रक्तात भिनला आहे, सन 1985 च्या आधी यांचे काय उत्पन्न होते? स्टेटमेंट काढा, उत्पन्नाचे साधन काय बाळासाहेबांच्या नावाने बावळट मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या राजकारणात झाला, त्याला फायनान्स माहिती नाही, रोजगार कळत नाही, असे म्हणत नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. तू पावसाबाबत बोल. मोदी, फडणवीस, शिंदे यांच्यामुळे भुयारी मेट्रो आली, रस्त्यावर शिवसैनिकांनी उतरला. आज चालता येत नाही, एवढे शिवसैनिक आहेत पण एकही दिसत नाही. 

आदित्य ठाकरेंना इशारा

दिनो मोर्या कोण, आदित्य त्याच्याकडे का येतो, काय करतात, ही सगळी माहिती माझ्याकडे आहे. पण, मी शांत आहे. मोदी, शाह, फडणवीस यांची नावे घेऊ नका, अशा शब्दात नारायण राणेंनी आदित्य ठाकरेंना इशारा दिला. तर, संजय राऊत तुम्हाला आत घेऊन जाईल, माझ्याकडे सर्व कागदपत्रे आहेत. मिठी नदीसाठी मशिन वापरली पाहिजे म्हणाले, केतन कदम हा लायजनर आहे. ही परवानगी कुणी दिली, दिसत नसलेले पाणी दाखवतो, यावर उत्तर दे असे राणेंनी म्हटले. तसेच, इलेक्ट्रिक घोडागाडी खरेदी केली, त्यात केतन कदम व दिनो मोर्याचा भाऊ पार्टनर आहेत, हे मराठी आहेत का, शिवसैनिक आहेत का? उद्धव ठाकरे यांनी किती शिवसैनिकांना कामे दिली? असे अनेक सवाल राणेंनी उपस्थित केले आहेत. 

हेही वाचा

शेतजमीनच्या कामात 23 लाख घेतले, 5 लाख घेताना रंगेहात अटक; उपजिल्हाधिकारी ACB च्या जाळ्यात