मुंबई : देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit shah) सोमवारी महाराष्ट्र दौऱ्यावर होते, नागपूर येथील नियोजित कार्यक्रमानंतर त्यांनी माजी मुख्यमंत्री व खासदार अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानी भेट दिली. नांदेड-वाघाळा महापालिकेच्या माध्यमातून उभारलेल्या माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे अनावरण अमित शाह यांच्याहस्ते झाले. त्यानंतर, त्यांनी अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानी भेट दिली. दरम्यान, महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या अमित शाह यांची उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांच्यासमवेत सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली असून 20 मिनिटांच्या बैठकीत राजकीय चर्चा झाल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) गेल्याच आठवड्यात छगन भुजबळ यांना मंत्रिपदाची जबाबदारी दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धनंजय मुंडे नाराज असल्याची चर्चा आहे. त्याच पार्श्वभूमीवर या बैठकीकडे राजकीय नजरा लागल्या असून दोन नेत्यांमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने चर्चा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय गृहमंत्री सह्याद्री अतिथी गृहावर अमित शहा यांची 20 मिनिटे बैठक झाली असून भेटीचं कारण अस्पष्ट आहे. मात्र, वरिष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना मिळालेलं मंत्रिपद हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्याची चर्चा एका वर्तुळात सुरू आहे. एकीकडे सातत्याने ही चर्चा असताना दुसरीकडे माजी मंत्री धनंजय मुंडे हे देखील राजकीय पुनर्वसनासाठी आग्रही आहेत. या सगळ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीला विशेष महत्व आले होते. त्यामुळे, दोघांमध्ये नेमकी कोणती चर्चा झाली याची उत्सुकता राष्ट्रवादीसह महायुतीमधील सर्वच नेत्यांना लागून आहे.
दरम्यान, नागपूर येथील कार्यक्रमातून गृहमंत्र्यांनी मोदी सरकारच्या कामाचं कौतुक केलं. काही जण म्हणतात मोदींनी काय केलं? तर जीडीपी 10 नंबरवरून 4 नंबरवर आणला. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून एक चुटकी सिंदूरचं महत्व सगळ्या जगाला दाखवलं, सगळ्यात जास्त सिंदूर हा शब्द गुगवलवर सर्च केला. 10 कोटी लोकांनी हा शब्द सर्च केला. तरीही अजून सिंदूरचं महत्व त्या लोकांना कळालेलं नाही, असे म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांवर निशाणा साधला. माधवबाग येथील लक्ष्मी-नारायण मंदिराच्या 150 व्या उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
अमित शाह दिल्लीला रवाना
अमित शाह यांच्याहस्ते आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी राज्य प्रेरणागीत पुरस्कार वितरण करण्यात आले. अनादि मी, अनंत मी ह्या गाण्याला हा पुरस्कार देण्यात आला. तसेच, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिष्ठानला देण्यात आलेला पुरस्कार रणजीत सावरकर यांनी स्विकारला. मुख्यमंत्र्यांसोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांचीही यावेळी प्रमुख उपस्थिती होती. या पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर अमित शाह दिल्लीला रवाना झाले आहेत.
महाराष्ट्रात रेड, यलो अलर्ट
राज्यात आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली आणि सातारा रेड अलर्ट देण्यात आला असून रायगड, पुणे, बीड, हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट आहे. तर, पालघर, नाशिक वगळता उर्वरित महाराष्ट्रात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मच्छिमारांना 27 मे 2025 पर्यंत पूर्व-मध्य आणि दक्षिण अरबी समुद्र आणि लगतच्या ईशान्य-अरबी समुद्र, लक्षद्वीप आणि कोमोरिन क्षेत्रात आणि केरळ, कर्नाटक आणि कोकण-गोवा किनाऱ्यालगत आणि बाहेरील भागात जाऊ नये, असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.