Narayan Rane Meets Sada Sarvankar : शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) आणि शिवसेनेच्या (Shiv Sena) वादात आता भाजप ज्येष्ठ नेते नारायण राणे (Narayan Rane) यांची एन्ट्री झाली आहे. नारायण राणे यांनी आज आमदार सदा सरवणकर यांच्या घरी जाऊन भेट घेतली. मुंबईतील प्रभादेवी इथे झालेल्या राड्यानंतर (Prabhadevi Rada) नारायण राणे हे दुपारी बाराच्या सुमारास सदा सरवणकर यांच्या दादरमधील निवासस्थानी भेटीसाठी पोहोचले. स्वत: सदा सरवणकर आणि त्यांचे पुत्र माजी नगरसेवक समाधान सरवणकर हे नारायण राणेंच्या स्वागतासाठी घराखाली उभे होते.


राणे-सरवणकर भेटीला विशेष महत्त्व
नारायण राणे आणि सदा सरवणकर यांचं नातं जुनं आहे. सदा सरवणकर हे 2009 मध्ये शिवसेनेची साथ सोडून नारायण राणे यांच्यासोबत काँग्रेसमध्ये देखील गेले होते. अनंत चतुर्दशी आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी महेश सावंत आणि सदा सरवणकर यांच्या गटात वाद झाला होता. हे दोघेही एकेकाळचे सहकारी होते. महेश सावंत देखील सदा सरवणकर यांच्यासोबत नारायण राणेंचा हात धरुन काँग्रेसमध्ये गेले होते. परंतु कालांतराने हे दोघेही शिवसेनेत परतले. मात्र सध्याची राजकीय परिस्थिती पाहता सदा सरवणकर हे आता शिंदे गटाचे आमदार आहेत. तर महेश सावंत हे दादर-प्रभादेवीमध्ये त्यांचे कट्टर विरोधक समजले जात आहेत. एकंदरी सदा सरवणकर, महेश सावंत आणि नारायण राणे यांच्यातील जुनी जवळीत आणि सध्याचे बिघडलेले संबंध हे पाहता राणे आणि सरवणकर यांच्यातील ही भेट राजकीयदृष्ट्या आणि प्रभादेवीतील राड्याच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची समजली जात आहे.


नारायण राणे काय म्हणाले?
दरम्यान सदा सरवणकर यांच्या भेटीनंतर नारायण राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राणे म्हणाले की, आमदार सदा सरवणकर हे माझे मित्र आहेत, काल जो प्रकार घडला, त्यानंतर त्यांची विचारपूस करण्याच्या हेतूने आलो. आमची युती आहे. एकमेकांना मदत करणं हा युतीधर्म आहे. त्या पार्श्वभूमीवर मी विचारपूस करण्यासाठी आलोय." "तक्रार दिलीय त्याची पोलीस चौकशी करतील. फायरिंग झालंय असं म्हणता, तर आवाज आला का?" असा सवालही नारायण राणेंनी उपस्थित केला. मातोश्रीच्या दुकानात बसून तक्रारींचं मार्केटिंग करण्याशिवाय दुसरं काही काम उरलेलं नाही. पण असले हल्ले-बिल्ले करु नका, मुंबई आणि महाराष्ट्रात राहायचंय फिरायचंय ना? परवानगी घ्यावी लागेल. पक्षाचा प्रश्न नाही, मित्र आहे म्हणून आलो, असंही राणे म्हणाले. 


प्रभादेवीत शिंदे गट आणि शिवसैनिकांमध्ये राडा 
गणेश विसर्जनासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत शिवसेना आणि शिंदे गटाच्या समर्थकांमध्ये मोठा राडा झाला होता. प्रभादेवी या ठिकाणी गणेश विसर्जनावेळी शिवसेना आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसैनिकांना शांत राहण्याचे आदेश दिल्यानंतर संघर्ष टळला होता. परंतु शनिवारी हा वाद पुन्हा उफाळून आला. सदा सरवणकर समर्थकांकडून शिवसैनिकांना डिवचण्याचा प्रयत्न केल्यानंतर शाब्दिक बाचाबाचीही झाली. यानंतर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी शिवसेना विभागप्रमुख महेश सावंत यांच्यासह शिवसैनिकांना पिस्तूलचा धाक दाखवून गोळीबार केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला होता. त्यानंतर सदा सरवणकर यांच्यासह समर्थकांवर गुन्हा दाखल झाला.


VIDEO : Narayan Rane on Sada Sarvankar : मातोश्रीवरुन तक्रारीचं मार्केटिंग सुरु आहे : नारायण राणे