Narayan Rane On Uddhav Thackeray: त्रिभाषा धोरणाबाबतचा जीआर सरकारने रद्द केल्यावर आता 5 जुलैला ठाकरेंची शिवसेना आणि मनसे विजयी मेळावा साजरा करणार आहेत. मुंबईतील वरळी डोम येथे ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांचा भव्य एकत्रित मेळावा होणार आहे. शिवसेनेचं मुखपृष्ठ असलेल्या सामनामधून मेळाव्याचे ठिकाण अधिकृतपणे जाहीर करण्यात आलं आहे. विजयी मेळाव्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) एकाच व्यासपीठावर पाहायला मिळणार आहेत. मेळाव्याची जोरदार मोर्चेबांधणी सुरू असून ठाकरेंची शिवसेना आणि मनसे नेत्यांमध्ये नियोजनाच्या बैठका सुरू आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय राऊत, अनिल परब, वरूण सरदेसाई तर मनसेकडून बाळा नांदगावकर, अभिजीत पानसे, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई यांच्याकडे नियोजनाची जबाबदारी देण्यात आली आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तब्बल 20 वर्षांनी एकत्र येणार आहेत. याचदरम्यान भाजपचे खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. जो बूंद से गई वो हौद से नहीं आती..., असं म्हणत उद्धव ठाकरे भाऊबंदकी या नात्याने राज ठाकरे यांना परत जवळ करायचे प्रयत्न करत आहेत. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांना छळले होते, त्रासही दिला होता, पक्षाबाहेर जायला यांनीच प्रवृत्त केले होते. त्याची यांना जाणीव नाही वाटतं ? आणि आता का म्हणून लाळ ओकताहेत, असा प्रश्न नारायण राणेंनी उपस्थित केला आहे.
शिवसेनेच्या अधोगतीला पूर्ण जबाबदार उद्धव ठाकरे- नारायण राणे
राज ठाकरे, नारायण राणे, गणेश नाईक, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना वाढीसाठी आयुष्य दिले. त्यांना बाहेरचा रस्ता दाखवून दिला. माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला सत्तेत बसविले याने सत्ता घालवली. शिवसेनेच्या अधोगतीला पूर्ण जबाबदार उद्धव ठाकरे आहे. गेलेले परत मिळवण्याची धमक, क्षमता उद्धव ठाकरेंमध्ये नाही, अशी टीका नारायण राणे यांनी सोशल मीडियावरून केली आहे.
नारायण राणेंची पोस्ट जशीच्या तशी-
उद्धव ठाकरे सन्माननीय राज जी ठाकरे यांना भाऊबंदकी या नात्याने परत या असे म्हणून प्रयत्न करीत आहेत. मला आठवते याच उद्धव ठाकरेंनी राज जी ठाकरे यांना छळले होते, त्रासही दिला होता, पक्षाबाहेर जायला यांनीच प्रवृत्त केले होते. त्याची यांना जाणीव नाही वाटतं ? आणि आता का म्हणून लाळ ओकताहेत.सन्माननीय राज जी, नारायण राणे, गणेश नाईक, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना वाढीसाठी आयुष्य दिले त्यांना बाहेरचा रस्ता दाखवून दिला. माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला सत्तेत बसविले याने सत्ता घालविली. शिवसेनेच्या अधोगतीला पूर्ण जबाबदार उद्धव ठाकरे आहे. मराठी माणसाने व हिंदूंनी याला घरी बसविले. गेलेले परत मिळवण्याची धमक व क्षमता उद्धव ठाकरे मध्ये नाही ! जो बूंद से गई वो हौद से नहीं आती!