नागपूर: बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येची घटना महाराष्ट्राच्या भूमीला कलंक लावणारी आहे. या राज्यातील शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार संपुष्टात आणण्याचा प्रयत्न सुरु आहे, असे वक्तव्य काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केले. बीडमधील गुंड वाल्मिक कराडला पोलीस सुरक्षा देण्यात आली आहे. त्याच्यासोबत तीन पोलीस कर्मचारी असतात. ज्याच्यावर अनेक गुन्हे आहेत, असा माणसाला  पोलीस सुरक्षा का दिली जाते? गेल्या अडीच वर्षांच्या काळात राज्यात महायुतीचे सरकार होते. या सरकारने राज्यात गुंडाझमला ताकद देण्याचे काम केले, असे नाना पटोले यांनी म्हटले. ते गुरुवारी विधानसभेत बीड आणि परभणीतील घटनांबाबत आयोजित करण्यात आलेल्या चर्चेत बोलत होते.


यावेळी नाना पटोले यांनी वाल्मिक कराड यांच्या नावाचा उल्लेख केला. तसेच याप्रकरणात एक मंत्रीही सहभागी असल्याची कुजबुज रंगल्याचे सांगत पटोले यांनी अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडे यांच्याकडे अंगुलीनिर्देश केला. गेल्यावेळी परळीत आंधळे आणि गिते यांच्यात गोळीबार झाला. आंधळेंचा खून झाला. त्याचंही संचलन करणारा व्यक्ती वाल्मिकी कराड होता. परळीत ही घटना घडली तेव्हा पाटील आणि महाजन हे दोन पोलीस अधिकारी तिकडे होते. आता संतोष देशमुख हत्याप्रकरणातही हेच दोन अधिकारी आहेत. त्यामुळे वाल्मिक कराडच्या आदेशानेच पोलिसांची नियुक्ती होते का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. यामध्ये एका मंत्र्याचा सहभागी असल्याची कुजबुज रंगली आहे. मुख्यमंत्र्यांकडून या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळेल, ही अपेक्षा असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले.


वाल्मिक कराडने पोलिसांना 200 लोकांवर गुन्हे दाखल करायला लावलेत: नाना पटोले


वाल्मिक कराड याने गेल्या चार-पाच दिवसांत बीडमधील पोलिसांना 200 लोकांवर गुन्हे दाखल करायला लावले आहेत, अशी माहिती आहे. वाल्मिक कराड हाच तिकडे शासन चालवत आहे. त्याच्यावर कोणाचा वरदहस्त आहे? पोलीस शासनाचं ऐकतात की गुंडाचं? मी वाल्मिक कराडला गुंड म्हणत आहे कारण त्याने अनेक खून केले आहेत. विधानसभेचे आमदारही वाल्मिक कराडच्या आकाचं  नाव घ्यायला घाबरत असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले. 


राज्यात अडीच वर्षांपासून गुंडाराज सुरु आहे, ते अजूनही संपलं नाही. मी 1999 साली सभागृहात आलो त्यावेळी अरुण गवळी ही सभागृहात होता. त्याच्याशेजारी कोणीही बसायला तयार नव्हते. ⁠वाल्मिक कराडही या सभागृहात येऊन बसला तरी आश्चर्य वाटायला नको, असे नाना पटोले यांनी म्हटले. 



आणखी वाचा


संतोष देशमुखांचा पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर, चेहरा काळानिळा पडला, डोळेही जाळले