मुंबई : महाविकास आघाडीमधील कालच्या बैठकीत शिवसेना खासदार संजय राऊत आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात तू तू मै मै झाल्याची माहिती आहे. मात्र, त्यानतंर, आज महाविकास आघाडीच्या (MVA) नेत्यांनी राज्य निवडणूक आयुक्त चोकलिंगम यांची भेट घेतली. आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने मविआच्या नेत्यांनी निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व निष्पक्ष पार पाडण्यासंदर्भात चर्चा केली. त्यानंतर, शिवसेनेच्या शिवालय जनसंपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन नाना पटोलेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत. मात्र, मविआ नेत्यांची ही पत्रकार परिषद चर्चेत राहिली ती, नाना पटोले आणि संजय राऊत यांच्या विसंवादामुळे. संजय राऊत (Sanjay Raut) हे त्यांच्या पक्षश्रेष्ठींचं म्हणजेच उद्धव ठाकरेंचं ऐकत नसतील तर हा त्यांचा प्रश्न आहे, असे म्हणत नाना पटोले यांनी संजय राऊतांबद्दलची नाराजी उघड केली. त्यामुळे, पुन्हा एकदा महाविकास आघाडीतील बिघाडी चव्हाट्यावर आली आहे.  


विधानसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीने 119-86-75 अशा पद्धतीने जागावाटप करायचे ठरवल्याची सुत्रांची माहिती आहे. मात्र, महाविकास आघाडीत विदर्भातील जागावाटपावरुन बिघाडी झाल्याचे समजते. नाना पटोले व संजय राऊत यांच्यात विसंवाद वाढल्याने आपण थेट काँग्रेसच्या दिल्लीकर नेत्यांशी बोलणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. त्यानंतर, आजच्या पत्रकार परिषद नाना पटोले यांनी संजय राऊत हे उद्धव ठाकरेंचं ऐकत नसतील तर तो त्यांचा प्रश्न आहे, असे म्हणत मविआतील वाद थेट पत्रकार परिषदेतून मांडल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे यावेळी शिवसेनेचे नेते अनिल देसाई हेही पत्रकार परिषदेला उपस्थित होते. त्यावर, देसाई यांनी ते तसं नाही, म्हणत बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.


पत्रकार परिषदेत नेमकं काय घडलं 


महाविकास आघाडीच्या आजच्या पत्रकार परिषदेतून काँग्रेस-ठाकरेंच्या शिवसेनेतला विसंवाद भर पत्रकार परिषदेतून चव्हाट्यावर आला आहे. नाना पटोलेंनी मविआच्या नेत्यांसमोरच संजय राऊतांबद्दलची नाराजी जाहीर केली. जागावाटपाच्या चर्चेसाठी काँग्रेसचं राज्यातील नेतृत्व सक्षम नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय, असा प्रश्न नाना पटोले यांना विचारण्यात आला होता. त्यावर, संजय राऊत उद्धव ठाकरेंचं म्हणणं ओलांडत असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे, असे उत्तर नाना पटोले यांनी दिलं. त्यानंतर, अनिल देसाई आणि जितेंद्र आव्हाडांकडून पटोलेंना शांत करण्याचा प्रयत्न झाला. त्यावरुन, ठाकरे-राऊत यांच्यात विसंवाद असल्याचे स्पष्ट झाले.दरम्यान, भरपत्रकार परिषदेतच हा प्रकार घडल्याने सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 



नाना पटोलेंचे मुख्यमंत्र्‍यांवर गंभीर आरोप


विधानसभा निवडणूक निष्पक्ष व पारदर्शक झाली पाहिजे, मतदान वाढले पाहिजे असे निवडणूक आयोग सांगत असते पण निवडणूक आयोगाच्या कामातच पारदर्शकता व निष्पक्षपातीपणा दिसत नाही. सत्ताधारी पक्षाच्या इशाऱ्यावर अधिकारी काम करत आहेत. ऑनलाईन फॉर्म 7 च्या माध्यमातून मविआच्या मतदारांची नावे मोठ्या प्रमाणात मतदार यादीतून वगळली जात आहेत, यामागे एकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीस आहेत असा गंभीर नाना पटोले यांनी केला. तसेच, रडीचा डाव खेळू नका, हिंमत असेल तर आमने-सामने लढा असा इशाराही पटोले यांनी दिला आहे. मविआनं आज पत्रकार परिषद घेत मतदार यादीतील घोळावर गंभीर आरोप केले आहेत. 


हेही वाचा


महाविकास आघाडीत मोठी बिघाडी; नाना पटोले असल्यास बैठकीला उपस्थित राहणार नाही, ठाकरेंच्या शिवसेनेचा इशारा