Nana Patole on Dhananjay Munde  : कापूस साठवणुकीच्या पिशव्या खरेदीत महायुती सरकारकडून 41 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केलाय. बेकायदेशीररित्या निविदा काढल्या आहेत. तसेच एकाच परिवाराच्या चार कंपन्यांना काम देण्यात आलं आहे. निवडणूक आयोगाची परवानगी न घेता आचारसंहितेत मंजूरी कशी दिली? असा सवालही नाना पटोलेंनी केलाय. त्यामुळं महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाचे महाव्यवस्थापकीय संचालक (एमडी) तथा उप सचिव वस्त्रोद्योग श्रीकृष्ण पवार आणि तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी संगनमत करुन 577 रुपयांची पिशवी 1250 रुपयांना खरेदी करुन 41 कोटी 59 लाख रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप नाना पटोलेंनी केलाय. या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करुन श्रीकृष्ण पवार आणि धनंजय मुंडेंवर कारवाई करा अशी मागणी देखील त्यांनी केलीय. 

Continues below advertisement

तत्कालीन एकनाथ शिंदे-भाजपा सरकारमधील भ्रष्टाचाराचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र राज्य यंत्रमाग मंडळाच्या माध्यमातून कापूस साठवणूक बॅग खरेदीसाठी निविदा वेगळ्या शिर्षकाखाली काढून 77 कोटी रुपयांची खिरापत वाटून 41.59 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप नाना पटोलेंनी केला आहे. या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. 

भाजपा युती सरकारने भ्रष्टाचाराचे अनेक विक्रम मोडीत काढले

Continues below advertisement

कृषी विभागातील भ्रष्टाचारावर तोफ डागताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजपा युती सरकारने भ्रष्टाचाराचे अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. शेतकऱ्यांच्या नावावर कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. कापूस साठवणूक पिशव्या खरेदीतही भ्रष्टाचार करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाच्या माध्यमातून हा भ्रष्टाचार करण्यात आला असून 77.25 कोटी रुपये यासाठी देण्यात आले आहेत. एकाच परिवारातील 4 वेगवेगळ्या कंपन्याना बेकायदेशीररित्या निविदा काढून हे काम देण्यात आले आहे. यंत्रमाग महामंडळाचे महाव्यवस्थापकीय संचालक तथा उप सचिव वस्त्रोद्योग श्रीकृष्ण पवार यांनी त्यांच्या मर्जीतील एका पुरवठादाराला माहिती देऊन त्यांच्या संगनमताने सर्व प्रक्रिया राबवून गैरव्यवहार करण्यात आला आहे. ही खरेदी प्रक्रिया लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना निवडणूक आयोगाची परवानगी न घेताच करण्यात आली. या कामासाठी चार कंपन्यांची निवड करण्यात आली होती. त्यातील तीन कंपन्या ओसवाल या एकाच परिवारातील आहेत, तर चौथी कंपनी ओसवाल यांच्या सनदी लेखापालाची असल्याचे पटोले म्हणाले होते.  

प्रति पिशवी 1250 रुपयांचा दर 

यंत्रमाग महामंडळाने कापूस साठवणूक पिशव्या खरेदीसाठी प्रति पिशवी 1250 रुपयांचा दर मंजूर करण्यात आला. आयसीएआर नागपूर यांना याच पिशव्या 577 रुपये या दराप्रमाणे पुरवठा करण्यात आल्या आहे. म्हणजे प्रति पिशवी 673 रुपये जास्त दराने खरेदी करून एकूण 41 कोटी 59 लाख 35 हजार 536 रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाने आयुक्तालयाकडून कापूस साठवणूक बॅग उत्पादनासाठी कच्चा माल खरेदी करण्यासाठी निधी अग्रीम स्वरुपात 77.25 कोटी रुपये महामंडळास अदा करुन घेतला. महामंडळ कापूस साठवणूक पिशवी उत्पादकाकडून विकत घेऊन पुरवठा करणार होते. यात कच्चा मालाच्या खरेदीचा प्रश्नच येत नसताना कच्चा माल पुरवठा करण्यासाठी या शिर्षकाखाली हा व्यवहार करण्यात आला असेही नाना पटोले म्हणाले. 

कृषी साहित्य खरेदी आणि पुरवठ्याच्या डीबीटी योजनेत  मोठा गैरव्यवहार

एकनाथ शिंदे सरकारच्या काळात धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना कृषी साहित्य खरेदी आणि पुरवठ्याच्या डीबीटी योजनेत नियमबाह्य बदल करून मोठा गैरव्यवहार झाला आहे. या संदर्भात काँग्रेस पक्षाने सातत्याने सभागृहात व रस्त्यावर उतरून आवाज उठवला होता. पण सरकारने काहीच कारवाई केली नाही. तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी ही सर्व खरेदी तत्कालीन अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या परवानगीने आणि मान्यतेने झाली आहे. त्यामुळे या घोटाळ्यात हे सर्वच सहभागी आहेत. त्यामुळेच मुंडेंवर कारवाई का करत नाहीत ? असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला. 

महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या नावाखाली केला भ्रष्टाचार 

महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या नावाखाली विविध महामंडळाच्या माध्यमातून खरेदी आणि पुरवठ्यांच्या प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून लूट केली आहे. काँग्रेस पक्ष महामंडळाच्या माध्यमातून सुरु असलेल्या या भ्रष्टाचाराविरोधात विधिमंडळात आवाज उठवणार असून सरकारने कारवाई केली नाही तर रस्त्यावरची लढाई लढून या भ्रष्टाचा-यांवर कारवाई करायला सरकारला भाग पाडू असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.