Nagpur Winter Session : कर्नाटक (Karnataka) विधानसभेत महाराष्ट्राच्या विरोधात ठराव मंजूर केल्यानंतर त्याचे पडसाद नागपूरमध्ये (Nagpur) सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात (Nagpur Winter Session) पाहायला मिळाले. महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाच्या (Maharashtra Karnataka Border Dispute) मुद्द्यावर महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) आमदार कर्नाटक तसंच शिंदे सरकारच्या विरोधात चांगलेच आक्रमक झाले. विधानभवनाच्या पायर्‍यांवर उतरत जोरदार घोषणाबाजी केली तसंच काळ्या पट्ट्या बांधून आमदारांनी निषेध केला.


विरोधकांच्या घोषणांनी विधानभवन परिसर दणाणला


"बेळगाव कारवार आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे...", "बेळगाव कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे...", "सरकार हमको दबाती कर्नाटक को घबराती है...", "कुंभकर्णाने घेतलं झोपचं सोंग तिकडे कर्नाटक सरकार मारतंय बोंब...," "कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध...", "लोकशाहीचा खून करणार्‍या सरकारचा धिक्कार असो...," कर्नाटक सरकार मुजोरी करतंय, महाराष्ट्र सरकार कुंभकर्णासारखं घोरतंय...", "सीमा प्रश्नी भूमिका घ्या नाहीतर खुर्च्या खाली करा...", "भूखंडाचा श्रीखंड खाणार्‍या मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो...", अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला.


विधानसभेच्या आजच्या कार्यक्रमावर विरोधकांचा बहिष्कार 


दरम्यानजयंत पाटील (Jayant Patil) यांचं निलंबन, कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद आणि दिशा सालियन प्रकरणावरुन यंदाचं हिवाळी अधिवेशन चांगलंच तापलं आहे. विरोधक आज सभागृहात न जाता विधिमंडळाबाहेर आंदोलन करणार आहेत. विधानसभेच्या कामकाजात विरोधक सहभागी होणार नाहीत, असा निर्णय महाविकास आघाडीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे. त्याचसोबत विरोधकांकडून पायऱ्यांवर प्रतिसभागृह करण्यात आले आहे.


कर्नाटकच्या विधानसभेत महाराष्ट्राच्या विरोधात ठराव मंजूर


महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या विरोधात मांडलेला ठराव कर्नाटकच्या विधानसभेने एकमताने मंजूर झाला. महाराष्ट्राला एक इंचही जागा न देण्याचा ठराव गुरुवारी (22 डिसेंबर) मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मांडला, त्याला सर्वपक्षीयांनी पाठिंबा दिला. तसेच कर्नाटकाकडे कोणीही वक्रदृष्टीने पाहिल्यास कोणत्याही गोष्टीची पर्वा केली जाणार नाही असा इशारा यावेळी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्राला दिला. सीमा प्रश्न आमच्यासाठी संपलेला आहे. कारण 66 वर्षांपूर्वी महाजन आयोगाने सीमाप्रश्न संपुष्टात आणला आहे. महाराष्ट्रातील राजकीय नेते जाणीवपूर्वक सीमाप्रश्न उकरुन काढत आहेत. महाराष्ट्रातील मंत्र्यांची कर्नाटकमध्ये येण्याचा प्रयत्न हा लोकांना चिथावण्याचा प्रकार आहे. महाराष्ट्राने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सूचनांचं उल्लंघन केलं आहे. गृहमंत्री अमित शाहांनी दोन्ही राज्यांनी एकमेकांसोबत सौहार्दाचे संबंध ठेवावेत अशा सूचना केलेल्या असताना महाराष्ट्राची कृती ही दोन्ही राज्यातील संबंध खराब करणारी आहे, असं बसवराज बोम्मई म्हणाले. यावेळी बोलताना बोम्मई यांनी संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलं. संजय राऊत देशद्रोही असून ते चीनचे एजंट असल्याचं ते म्हणाले.