Umesh Patil on Ajit Pawar: राज्यात सध्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा आहे. बारामतीला माझ्याशिवाय दुसरा आमदार मिळायला पाहिजे. लोकसभेला जशी गंमत झाली तशी जर गंमत होणार असेल तर झाकली मूठ सव्वा लाखाची चांगली, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं. यावत आता राष्टवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटलांनी कारण सांगितलंय.


राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आज राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य महत्वाचं मानलं जात आहे.यावर राष्ट्रवादीा शरद पवार गटासह विरोधी पक्षांकडून प्रतिक्रीया येत आहेत. पण अजित पवार असं का म्हणाले यावर राष्ट्रवादी प्रवक्ते उमेश पाटील यांनी काय सांगितलं?


काय म्हणाले उमेश पाटील?


अजित पवार यांनी बारामतीचा जो विकास केलेला आहे तो पाहिला जगभरातून लोक येतात असं असताना देखील सुनेत्रा पवार यांच्यासाठी आवाहन अजित पवार यांनी करूनही त्यांचा पराभव झाला यामुळेच अजित पवारांनी आपली खंत बोलून दाखवली असावी असं त्यांच्या भाषणातून वाटतं. असं प्रवक्ते उमेश पाटील म्हणाले.


लोकसभेला ताई, विधानसभेला दादा?


बारामतीच्या जनतेने ठरवलं असेल लोकसभेला ताई विधानसभेला दादा त्यामुळे नक्कीच बारामती विधानसभेमध्ये आपल्याला अजित पवारांच्या पाठीमागे जनता उभी राहिलेली पाहायला मिळेल. अजित पवार म्हणाले की दुसरा आमदार मिळाल्यानंतर तुम्हाला कळेल की मी किती नेमकं काम केलेला आहे. त्यामागचं कारण असं मोठ्या प्रमाणात अजित पवारांनी विकास काम बारामतीत केली मात्र लोकसभेचा निर्णय वेगळा लागला एवढेच आहे. असे उमेश पाटील म्हणाले.


काम करूनही अजितदादांना वेदना


अजित पवारांच्या या वक्तव्यावर त्यांच्या गटाचे प्रवक्ते अनिल पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, एखाद्या काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या घरातील व्यक्तीला जनता पराभूत करते त्यावेळी त्याला वेदना होतात. अजितदादांनी बारामतीचा मोठा विकास केला. तो विकास पाहण्यासाठी देशभरातून लोक येतात. अजितदादा सकाळी 6 पासून रात्री 11 पर्यंत काम करतात. 


शरद पवार गटाची प्रतिक्रिया काय?


पवार साहेबांना सोडल्यानंतर त्यांची किंमत काय हे आता अजितदादांना समजलंय. पवार साहेबांनी अजितदादांच्या ताब्यात पूर्ण पक्ष दिला. पण त्याचा गैरवापर अजितदादांनी केला. तुम्हाला जर आता पश्चाताप झाला असेल तर पक्ष पुन्हा एकदा पवार साहेबांच्या ताब्यात द्यावा अशी प्रतिक्रिया शरद पवार गटाचे नेते महेश तपासे यानी दिली.