Mumbai Lok Sabh Election 2024 : मुंबई : देशात लोकसभा निवडणुकांचा (Lok Sabha Election 2024) आज पाचवा टप्पा पार पडतोय. मुंबईतील (Mumbai Lok Sabha Election 2024) सहा मतदारसंघांमध्ये आज मतदान (Voting) पार पडतंय. अशातच महाराष्ट्रातील राजकारणातील (Maharashtra Politics) मोठं नाव म्हणजे, ठाकरे. याच ठाकरे कुटुंबातील दोन भाऊ, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनीदेखील मतदानाचा हक्क बजावला आहे. दोन्ही ठाकरे सहकुटुंब मतदानासाठी मतदान केंद्रावर पोहोचले. अशातच राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवाजी पार्कातील बालमोहन शाळेत सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. तर, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी वांद्रे येथे आपला मतदानाचा हक्क बजावला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बजावला मतदानाचा हक्क
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. राज ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या शीवतीर्थवरुन मतदानकेंद्रापर्यंत चालत जाऊन मतदान केलं. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, कन्या उर्वशी ठाकरे, पुत्र अमित ठाकरे आणि सुष्ना मिताली ठाकरे उपस्थित होत्या. दरम्यान, राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. राज ठाकरे राहत असलेल्या मतदारसंघात ठाकरे गटाचे अनिल देसाई आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून राहुल शेवाळे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांनी शिवसेनेला मतदान केल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, "उन्हाळ्याचे दिवस आहेत. आताच सुरुवात झाली आहे. संध्याकाळी सहापर्यंत मतदान सुरू राहणार आहे. जास्तीत जास्त मतदान बाहेर पडून मतदानाचा हक्क बजावतील अशी मला अपेक्षा आहे. ज्यांना पहिल्यांदा मतदानाचा अधिकार मिळाला आहे. ते सर्वजण मतदानासाठी घराबाहेर पडतील. पण ज्यांनी आशाच सोडल्यात त्यांचं काही सांगता येत नाही.
उद्धव ठाकरेंचं सहकुटुंब मतदान
शिवसेनेतील अंतर्गत फुटीनंतरची लोकसभा निवडणूक पहिली निवडणूक आहे. त्यामुळे ठाकरेंसोबतच बंडखोरी करणारे एकनाथ शिंदेंचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अशातच ठाकरे गट महाविकास आघाडीसोबत निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहे. अशातच उद्धव ठाकरेंनी वांद्रे येथे आपला मतदानाचा हक्क बजावला. उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून वर्षा गायकवाड आणि महायुतीकडून उज्वल निकम निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. उद्धव ठाकरेंच्या मतदानानंतर ठाकरेंनी पहिल्यांदाच काँग्रेसच्या पंजाला मतदान केल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
पैशांच्या प्रलोभनांना जनता भुलणार नाही : उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरेंनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे म्हणाले की, "देशातील लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी बाहेर पडून पडून मतदानाचा हक्क अबाधित राहावा यासाठी मतदान करतील. आज एका निगेटिव्ह विषय हा जुमलेबाजांच्या बाजूने जातोय, कारण पैशाचा पाऊस स्वीकारणार नाहीत, कारण पैसा घेऊन कोणी आपलं आयुष्य विकायला नाहीत." तसेच, पैशांच्या प्रलोभनांना जनता भुलणार नाही, असा विश्वासही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं आहे.
आजचं हे मत देशासाठी आणि संविधान संवर्धनासाठी महत्त्वाचं : आदित्य ठाकरे
मतदानाचा हक्क बजावल्यानंतर आदित्य ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, "आम्ही देशासाठी मतदान केलंय, संविधान रक्षणासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी तुम्ही मतदान करा, हा तुमचा हक्क आणि अधिकार आहे. काही ठिकाणी मतदार यादीत गोंधळ दिसतोय, उन्ह आहे, सावलीसाठी मंडप वगैरेची सोय करायला हवी... निवडणूक आयोगाने तयारी करायला हवी होती. अनेक ठिकाणी मतदानाच्या रांगा आहेत, मतदार बाहेर येतील आणि मतदान करतील."
पाहा व्हिडीओ : Raj Thackeray Voting Lok Sabha : मी काय ज्योतिषी म्हणून बसलोय का? मतदानानंतर राज ठाकरे भडकले!
पाहा व्हिडीओ : Uddhav Thackeray Voting Lok Sabha : "पैशांच्या प्रलोभनाला जनता भुलणार नाही" - उद्धव ठाकरे