Congress: मुंबई काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते रॅलीमध्ये सहभागी होणार व रामलीला मैदान गाजवणार, अशी घोषणा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी आज मुंबईत केली. भाजप सरकारच्या देशविरोधी आणि चुकीच्या धोरणांमुळे वाढलेल्या महागाई व बेरोजगारी विरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची 4 सप्टेंबर 2022 रोजी दिल्लीतील रामलीला मैदानामध्ये भव्य रॅली काढण्यात येणार आहे. त्याच्या पूर्वतयारीसाठी मुंबई काँग्रेसतर्फे मुंबईतील 6 जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीदरम्यान भाई जगताप बोलत होते. 


या बैठकीला भाई जगताप  यांच्या समवेत, मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, AICC सचिव आशिष दुआ, माजी आमदार अशोकभाऊ जाधव, वरिष्ठ उपाध्यक्ष वीरेंद्र बक्षी, मुंबई काँग्रेसचे कोषाध्यक्ष भूषण पाटील, सरचिटणीस संदेश कोंडविलकर, सहकोषाध्यक्ष अतुल बर्वे, मुंबई काँग्रेसचे सर्व जिल्हाध्यक्ष आणि मुंबई काँग्रेस व मुंबई युथ काँग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. 


एआयसीसी सचिव आशिष दुआ या वेळेस बोलताना म्हणाले की, भाजपने त्यांच्या 8 वर्षांच्या काळात फक्त कामधंदा पंक्चर योजना, आत्मगुणगान योजना, महंगा राशन - सस्ता भाषण योजना, महिला उत्पिडन योजना आणि देशाला तोडण्याची योजना यांसारख्या योजना देशात आजतागायत राबवत आहे. ईडी, सीबीआय सारख्या दुरुपयोग या केंद्रातील भाजप सरकारने केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे मंत्री पैशाच्या आणि सत्तेच्या जोरावर फक्त फोडाफोडीचे घाणेरडे राजकारण करत आहेत. या आधी सुद्धा राजकारण व्हायचे त्यामध्ये सर्वांना एकत्र घेऊन चालणे, विरोधकांचे म्हणणे सुद्धा ऐकून घेणे व त्यानुसार त्रुटींमध्ये सुधारणा करणे, अशा गोष्टी होत होत्या. पण त्या सर्व गोष्टींना तिलांजली देऊन फक्त फोडाफोडी करण्याचे घाणेरडे राजकारण मोदी सरकार करत आहे, असे ते म्हणाले.  


आशिष दुआ पुढे म्हणाले की, ''लोकतंत्र संपविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्या विरोधातच आपली ही लढाई आहे. देशामध्ये वाढती महागाई व बेरोजगारी थांबविण्यात हे मोदी सरकार संपूर्णपणे अपयशी ठरले आहे, ते सर्वांच्या निदर्शनात आणण्यासाठीच ही रामलीला मैदानावरील रॅली आहे. या रॅलीमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे, असे मी आवाहन करतो. कारण, उनके लाख अत्याचारों से भी हम तंग नही होंगे, लेकिन हमारे हौसलों से वे जरूर दंग होंगे.''