Sanjay Raut Reply To Privilege Notice : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विधीमंडळाच्या हक्कभंग नोटिशीला (Privilege Notice) उत्तर दिलं आहे. आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. "संपूर्ण विधीमंडळाबाबत मी कोणतेही आक्षेपार्ह वक्तव्य केले नसून माझे वक्तव्य एका विशिष्ट गटापुरतेच मर्यादित आहे. हे कृपया लक्षात घ्यावे तरीही या प्रकरणाबाबत सविस्तर खुलासा करण्याबाबत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.


"मी मुंबईच्या बाहेर असताना या वक्तव्याचा विपर्यास करण्यास आला. हे वक्तव्य विधीमंडळातील सदस्यांचा अवमान करण्याकरता केलं नसून ते एका विशिष्ट गटापुरतं होतं. विधीमंडळाच्या भावना दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता आणि नसणार आहे. मी केलेलं वक्तव्य तुम्ही तपासू पाहावं," अशी मागणी देखील संजय राऊत यांनी केली.


संजय राऊत यांनी याबाबत पत्र लिहिलं आहे. काय म्हणाले आहेत या पत्रात हे जाणून घेऊया...


मा. प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय,


जय महाराष्ट्र!


कोल्हापुरातील एका कार्यक्रमात विधान मंडळाबाबत केलेल्या वक्तव्याबाबत काही सदस्यांनी आक्षेप घेतला व विशेषाधिकार भंग व अवमानाची सूचना मांडली. याबाबत खुलासा करण्यासाठी आपण मला 3 मार्च 2023 पर्यंत सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत मुदत दिली.


1) मी आपणास नम्रपणे नमूद करू इच्छितो की, मी दि. 4 मार्चपर्यंत पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होतो व कर्नाटकच्या सीमेवरील भागात असल्याने मुंबईशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे दिलेल्या मुदतीत खुलासा करणे शक्य झाले नाही. तरी कृपया सविस्तर खुलासा करण्यासाठी आणखी मुदतवाढ मिळावी.


२) महाराष्ट्र विधान मंडळाचा व सदस्यांचा मी नेहमीच आदर करतो. प्रत्येक नागरिकाचे ते कर्तव्य आहे.


मी स्वतः अनेक वर्षे राज्यसभेचा सदस्य असल्याने मला अशा संसदीय मंडळांचे महत्त्व माहीत आहे. मी संपूर्ण विधान मंडळाबाबत कोणतेही आक्षेपार्ह वक्तव्य केले नसून माझे वक्तव्य एका विशिष्ट गटापुरतेच मर्यादित आहे. हे कृपया लक्षात घ्यावे.


तरीही या प्रकरणाबाबत सविस्तर खुलासा करण्याबाबत मुदतवाढ द्यावी.


आपला नम्र,


(संजय राऊत)




काय म्हणाले होते संजय राऊत? 


कोल्हापूर दौऱ्यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना विधीमंडळाचा 'चोर'मंडळ असा उल्लेख केला होता. महाराष्ट्रात विधीमंडळ हे तर 'चोर'मंडळ, असं म्हणत संजय राऊत यांनी शिंदे गट आणि भाजपवर थेट निशाणा साधला होता. यानंतर राऊतांविरोधात सत्ताधारी शिवसेना गट आणि भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. तसेच, राऊतांविरोधात हक्कभंग आणण्याची मागणीही करण्यात आली होती.


VIDEO : Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हक्कभंग समितीच्या नोटीसला उत्तर