सोलापूर : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि त्यांच्या पिलावळ्यांचा सोलापुरात दंगली (Riots in Solapur) घडवण्याचा प्लॅन होता, असा गंभीर आरोपी काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे (Congress MP Praniti Shinde) यांनी केला आहे. सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत.  सोलापुरात दोन दिवस आधी दंगली लावणार होते. भाजपवाल्यांना लाज वाटायला पाहिजे. रक्ताने राजकारण करतात ही लोकं, असं म्हणत प्रणिती शिंदेंनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.


सोलापुरात दंगली घडवण्याचा फडणवीसांचा प्लॅन : प्रणिती शिंदे


सोलापूर लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर कृतज्ञता मेळाव्यात सोलापुरात बोलताना खासदार शिंदे यांनी हे वक्तव्य केलं आहे. कृतज्ञता मेळाव्यात प्रणिती शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपला लक्ष्य केलं आहे. काही दिवसापूर्वी एबीपी माझाशी बोलताना देखील हेच आरोप प्रणिती शिंदे यांनी केले होते. आता जाहीर भाषणातून पुन्हा एकदा प्रणिती शिंदे यांनी भाजपवर आरोप केले आहेत.


खासदार प्रणिती शिंदे यांचा भाजपवर गंभीर आरोप


गावामध्ये जिल्ह्यात येऊन भांडण आणि दंगल लावण्याचा प्रयत्न करणार होते. ते कानात सांगितलं गेलं होतं. मतदानाच्या दिवशी पोलिंगवर काय झालं होतं. सीपीनी सांगितलं होतं, जा बाहेर नाहीतर या उमेदवारावर एफआयआर करावा लागेल. त्यावेळेस भाजपवाल्यांना कळलं होतं, निवडणूक आपल्या हातातून गेली आहे. आता एकच उपाय आहे दंगल लावा. निवडणुकीत लोकांमध्ये विभागणी करा आणि निवडून या असं त्यांना सांगण्यात आलं होतं. त्यांची मतदानच्या पाच दिवस अगोदरची भाषण काढून बघा, त्यातून तुम्हाला हेच दिसेल, असंही यावेळी प्रणिती शिंदे यांनी म्हटलं आहे.


प्रणिती शिंदेंकडून सुशीलकुमार शिंदेंचे तोंड भरून कौतुक


प्रणिती शिंदे यावेळी म्हणाल्या की, हा विजय सर्वसामान्य माणसाचा, कामगारांचा, कष्टकरी माणसाचा आहे. मी खासदार केवळ तुमच्यामुळे झाली आहे, याची मला जाणीव आहे. खासदारकी डोक्यात गेली, असं जेव्हा तुम्हाला वाटलं तर, दणकण मला खाली ओढा. शिंदे साहेब म्हणाले की, माझे नेतृत्व अनेकजण स्वीकारायला तयार नाही, पण शिंदे साहेब तुम्ही किंगमेकर आहात, न संपणारे नेतृत्व आहात. तुम्ही अनेक निवडणुका लढल्या, मी स्वतः पाहिलंय की, आमच्या घरी लोकं चाकू-तलवार घेऊन आले होते. अशा निवडणुका तुम्ही लढल्या, लढाऊपणा मी तुमच्याकडून शिकले, असं म्हणत प्रणिती शिंदेंनी सुशीलकुमार शिंदेंचे तोंड भरून कौतुक केलं.


लोकांचं काम करण्यासाठी राजकारणात, सत्तेसाठी नाही


मी लहानपणापासून सत्ता बघितली, घरासमोर नेहमी लाल दिव्याची गाडी होती. मी लोकांचे काम करण्यासाठी राजकारणात, मी सत्तेसाठी राजकारणात आलेली नाही. महाविकास आघाडी असताना आम्ही कधीही मंत्रिपद मागितलं नाही, हे ऑन रेकॉर्ड आहे. मी शिवसेना उद्धव साहेबांचे खास आभार मानते, प्रत्येक ठिकाणी खांद्याला खांदा लावून त्यांनी काम केलं. भाजपवाले म्हणायचे, आम्हाला नका बघू आणि मोदींना बघून मतदान झालं, बरं झालं ते असं म्हणाले त्यांच्यामुळेच तुम्ही मोदींना बघितलं आणि मला मतदान केलं, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. 


भाजप आणि अतिरेक्यामध्ये काय फरक आहे?


संविधान संपवण्याची भाषा करणाऱ्यांना तुम्ही चपराक मारली. भाजप आणि अतिरेक्यामध्ये काय फरक आहे? हे देशात राहून भांडण लावतायत. लोकसभा निवडणुकीत सोलापुरात दंगली घडवण्याचा प्लॅन होता. भाजपने किती पैसे वाटले, एक साडी आणि 500 रुपये दिले. पैसे दिले तरी तुम्ही त्यांना मतदान केलं नाही. 


प्रणिती शिंदेंनी भाजप आमदाराचे मानले आभार 


प्रणिती शिंदे पुढे म्हणाल्या की, जे मतदारसंघात फिरले नाहीत त्या भाजपच्या आमदाराचे ही आभार मानते. 14 खासदार हे आता काँग्रेसचे आहेत, येणारा काळ हा देखील काँग्रेसचा आहे. आता एकच फाईट, कॉलर टाईट. केवळ माझी नाही तुमची ही कॉलर टाईट. इथून पुढे आता कामं घेऊन या, माझ्याकडे यायला कोणीही रोखणार नाही, पुढाऱ्यांचा आदर करते, पण तुम्ही देखील थेट कामं घेऊन या. मी कामं केलं नाही तर, कान पकडून मला खाली बसवा, असं प्रणिती शिंदे यांनी म्हटलं आहे.