Mohit Kamboj Tweet : मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि नवाब मलिक (Nawab Malik) हे दोन मोठे नेते तुरुंगात आहेत. त्याच आता भाजपचे (BJP) नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी केलेल्या ट्वीटमुळे खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठ नेता लवकरच अनिल देशमुख आणि नवाब मलिकांना भेटणार आहे, असं मोहित कंबोज यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे दोघेही सध्या मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेमक्या कोणत्या नेत्याकडे मोहित कंबोज यांनी इशारा केला आहे, असा प्रश्न या ट्वीटनंतर उपस्थित झाला आहे.


 






 


सिंचन घोटाळ्याची पुन्हा चौकशी होणार?
दरम्यान मोहित कंबोज यांनी मंगळवारी रात्री उशिरा तीन ट्वीट केले आहेत. त्यापैकी दुसऱ्या ट्वीटमध्ये "2019 साली परमबीर सिंह यांच्या काळात बंद करण्यात आलेल्या सिंचन घोटाळ्याची पुन्हा चौकशी झाली पाहिजे," असा उल्लेख आहे. खरंतर सिंचन घोटाळ्यात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचं नाव आलं होतं. 2019 साली लाचलुचपत प्रतिबंध विभागाने अजित पवार यांना सिंचन घोटाळ्याप्रकरणी क्लीन चिट दिली होती. ACB ने 19 डिसेंबर 2019 रोजी हायकोर्टात सादर केलेल्या शपथपत्रात अजित पवार यांना क्लीन चिट दिल्याचं स्पष्ट केलं होता. तत्कालीन ACB चे महासंचालक परमबीर सिंह यांनी कोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात, "या चौकशीत/तपासात प्रतिवादी क्रमांक 7 (अजित पवार) विरोधात गुन्हेगारी स्वरुपाचं उत्तरदायित्व आढळलं नाही."


 






 


राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याचा पर्दाफाश करणार : मोहित कंबोज
तर मोहित कंबोज यांनी केलेल्या आणखी एका ट्वीटमध्ये आपण लवकरच पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याचा पर्दाफाश करणार असल्याचं म्हटलं आहे. "भारत आणि परदेशातील मालमत्तेची यादी, बेनामी कंपन्या, गर्ल फ्रेंड्सच्या नावावरील संपत्ती, मंत्री म्हणून विविध खात्यांमध्ये केलेला भ्रष्टाचार, कौटुंबिक उत्पन्न आणि मालमत्तेची यादी," या गोष्टींचा पर्दाफाश करणार असल्याचं त्यांनी म्हटलं.






 


मोहित कंबोज यांच्या ट्वीटच्या मालिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा तो नेता नेमका कोण? सिंचन घोटाळ्याची पुन्हा चौकशी होणार का? तसंच कोणत्या नेत्याचा ते पर्दाफाश करणार आहेत, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. परंतु या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी मोहित कंबोज यांच्या पत्रकार परिषदेची प्रतीक्षा करावी लागणार आहे.


पाहा व्हिडीओ : ट्वीटमधून मोहित कंबोज यांचा कोणाकडे इशारा?