Modi Cabinet Expansion : एकीकडे बजेट अधिवेशनाच्या तारीख जाहीर झाल्या आहेत आणि सोबतच मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या (Cabinet Expansion) चर्चांनाही वेग पकडला आहे. पुढच्या आठवडाभरात कधीही मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. लोकसभेची निवडणूक एक वर्षावर आली आहे, पुढच्या वर्षभरात नऊ राज्यांच्या विधानसभा निवडणुका (Assembly Election) आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारासाठी हीच योग्य वेळ असल्याची चर्चा सुरु आहे. 


पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) या टर्ममध्ये केवळ एकदाच विस्तार केला आहे. 2014 ते 19 या पहिल्या टर्ममध्ये त्यांनी तीन वेळा विस्तार केला होता. त्यामुळे यावेळी निवडणुकांना सामोरं जाण्याआधी एक शेवटचा बदल तरी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संसदेचं अधिवेशन 30 जानेवारीपासून सुरु होतं आहे. त्याच्या दहा दिवस आधी कधीही हा बदल होऊ शकतो अशी चर्चा सुरु आहे. 


मोदींचा मंत्रिमंडळ विस्तार म्हटलं की त्यात धक्कातंत्र आलंच. मागच्या वेळी तर प्रकाश जावडेकर, रवी शंकर प्रसाद, हर्षवर्धन यांच्यासारख्या अनेक दिग्गजांना मंत्रिपद गमवावं लागलं होतं. त्यामुळे यावेळी काय अपेक्षित आहे पाहूया... 


मोदींच्या मंत्रिमंडळात काय बदल होणार?


- मोदींच्या मंत्रिमंडळात सध्या सर्व कॅबिनेट मंत्री हे केवळ भाजपचे आहेत


- शिवसेना, अकाली दल, जेडीयूच्या मंत्र्यांनी राजीनामे दिल्यानंतर एकाही मित्रपक्षाला यात प्रतिनिधित्व नाहीय


- नुकतंच शिंदे गट भाजपसोबत आला आहे, त्यामुळे शिंदे गटाला केंद्रातही  मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे


- प्रतापराव जाधव, राहुल शेवाळे यांच्या नावाची त्यासाठी चर्चा आहे


- मुख्तार अब्बास नक्वी यांचा राजीनामा, जेडीयूनं दूर जाणं, यामुळे पण नव्या रिक्त जागा तयार झाल्या आहेत


- मागच्या वेळप्रमाणे यावेळीही गच्छंतीमध्ये कुठल्या बड्या मंत्र्याचा समावेश होणार का याचीही कुजबूज सुरु आहे


विधानसभा निवडणुकीत यशापयशाचं प्रतिबिंब मंत्रिमंडळात दिसणार?


नुकत्याच गुजरात, हिमाचल विधानसभा आणि दिल्ली महापालिकेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. इथल्या यशापयशाचं प्रतिबिंब मंत्रिमंडळात दिसण्याची शक्यता आहे. सोबतच कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थानसारख्या महत्वाच्या राज्यांच्या निवडणुका पुढच्या काही महिन्यात आहेत. त्यामुळे त्याचाही विचार या विस्तारात होण्याची शक्यता आहे. 


16 आणि 17 जानेवारी अशी दोन दिवस भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आहे. 19 तारखेला मोदी मुंबईत असणार आहेत. मंत्रिमंडळ विस्तार नेमका कधी होणार याबद्दल ठाम तर कुणीच सांगू शकत नाही. पण जे अंदाज आहेत ते साधारणपणे 20 तारखेच्या आसपास आहेत. एकदा बजेट अधिवेशन सुरु झालं की ते संपणार आहे 6 एप्रिलला. त्यामुळेच अधिवेशनाच्या आधीच हा बदल होतो का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.