MNS Sandeep Deshpande Video: मनसे (MNS) आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून (Shiv Sena UBT) आज कॅश बॉम्बचा धमाका सुरु आहे. एकीकडे शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी शिंदेंचे आमदार महेंद्र दळवींचा (Mahendra Dalvi) कॅशसह व्हिडीओ समोर आणला आहे. तर, मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी पीडब्लुडीच्या (PWD) अधिकाऱ्यांचा लाच घेतानाचा व्हिडीओ समोर आणलाय. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. हिवाळी अधिवेशनात (Winter Session) ठाकरे बंधूंच्या नेत्यांच्या कॅश बॉम्बवर जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे. यामुळे हिवाळी अधिवेशन तापणार असल्याची चिन्ह दिसून येत आहेत.
संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत म्हटले आहे की, पीडब्लुडीच्या हाफकीन शाखेत शाखा अभियंता शासनाकडून येणाऱ्या निधीतील टक्केवारी घेतानाचा व्हिडीओ समोर आणलाय. 2 लाख 80 हजार रुपये केवळ शासनाचा निधी आणण्याकरता घेतले जात आहेत. निधी मिळण्यापूर्वीच कंत्राटदारांकडून पैसे घेतले जातात. आधी कंत्राटदारांकडून काही ठराविक टक्केवारी घेतली जायची. मात्र, आता निधी आणण्याचे, वर्क ऑर्डर काढण्याचे आणि अंतिम बिलाची वेगवेगळी टक्केवारी घेतली जाते. इतकंच नाही, तर भ्रष्टाचाराच्या टक्केवारीत कंत्राटदारांची बोलीही लागते आहे, असा आरोप त्यांनी केलाय.
MNS Sandeep Deshpande Video: संदीप देशपांडेंचा मोठा आरोप
संदीप देशपांडे पुढे म्हणाले की, आज पहिला व्हिडीओ समोर आणला आहे. आता दररोज असे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे व्हिडीओ समोर येणार आहेत. नोटांची बंडले घेणाऱ्या शाखा अभियंता विनोद धुमाळचा व्हिडीओ आज समोर आला. उद्या वरिष्ठ अभियंत्याचा व्हिडीओ समोर आणणार आहे. वरळीतील शाखेचा हा व्हिडीओ आहे. येथून निवडून गेलेले आमदार आदित्य ठाकरे यांनी विधीमंडळ अधिवेशनात याला वाचा फोडावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. तसेच, कंत्राटदारांना कामे झाल्यानंतरही पैसे मिळत नाहीत. कंत्राटदार सांगत आहेत की, आता आमच्यावर टक्केवारी देऊनही आत्महत्या करण्याची वेळ आलीय. रोहित आर्यचा एन्काऊंटर देखील याच कारणातून झाला असावा, असा मोठा आरोप देखील संदीप देशपांडेंनी केलाय.
इतर महत्त्वाच्या बातम्या