Raju Patil Meet  Devendra Fadnavis: कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार राजू पाटील यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज सदिच्छा भेट घेतली. त्यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा रंगली आहे. मनसेकडून विकास कामांबाबत ही भेट घेतल्याचं सांगण्यात आलं असून आमदार पाटील यांनी ट्वीट देखील केलं आहे. मात्र आज उपमुख्यमंत्री फडणविस यानी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर मनसे आमदार पाटील यांनी फडणविस यांची भेट घेतली. त्यामुळे ही सदिच्छा भेट होती की, मंत्री पदासाठीची फिल्डींग ही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.


मनसेचे आमदार पाटील हे पक्षाचे एकमेव आमदार आहे. त्यांचे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्याशी चांगले सख्य आहे. आमदार पाटील हे यापूर्वी विकास कामांच्या मुद्यावर तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना टिेकेचे लक्ष्य करीत होते. तसेच शिवसेना सरकारला धारेवर धरण्याचे काम करीत होते. सत्ता बदलानंतर सत्तेच्या समिकरणात मनसेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारला पाठींबा दिला. या पाठिंब्यामुळे नव्या सरकारच्या मंत्री मंडळात मनसेला मंत्री पद मिळणार ही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. मनसेचा एक आमदार आहे. त्याला हे मंत्री पद मिळणार ही चर्चा जोर धरू लागली. 






दरम्यान, आज उपमुख्यमंत्री फडणविस यानी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर मनसे आमदार पाटील यांनी फडणविस यांची भेट घेतली. मतदार संघातील समस्या व विकास कामांच्या संदर्भात ही भेट असल्याचे मनसेकडून सांगण्यात आले आहे. मात्र ही सदिच्छा भेट होती की, मंत्री पदासाठीची फिल्डींग ही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.