MNS Mira Bhayandar Morcha: मिरा-भाईंदरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मंगळवारी काढण्यात येणाऱ्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. आज सकाळी दहा वाजता बालाजी हॉटेलपासून (Balaji Hotel) या मोर्चाला सुरुवात होणार होती. मात्र, त्यापूर्वीच पोलिसांनी मनसेच्या अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. अनेक कार्यकर्त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. यानंतर मनसेचे (MNS) नेते संदीप देशपांडे यांनी आम्ही मोर्चा काढण्यावर ठाम असल्याचे म्हटले होते. मात्र, अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्ता शिंदे (Datta Shinde) यांनी मिरा-भाईंदरमध्ये नागरिकांनी मोर्चासाठी एकत्र येऊ नये. अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.
मीरा भाईंदरमध्ये आम्ही सर्व ठिकाणी पुरेसा बंदोबस्त नेमला आहे. महत्त्वाचे चौक, रेल्वे स्थानकं आणि जंक्शनच्या परिसरात बंदोबस्त नेमण्यात आला आहे. काल आम्ही शहरात रुट मार्च काढला होता. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार दक्ष आहेत. मी नागरिकांना आवाहन करतो की, मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली आहे. कोणीही मोर्चाचं ठिकाण जे सांगितलं होतं, तिकडे कोणीही येऊ नका. पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई सुरु केली आहे. ज्या व्यक्ती कायदा आणि सुव्यवस्थेच्यादृष्टीने बेकायदेशीर कृत्य करतील, असा संशय आणि वाजवी कारण होतं, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. काहींना ताब्यात घेतलं आहे. मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारित येणाऱ्या परिसरात पाचपेक्षा अधिक व्यक्तींना जमण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. नागरिकांनी पोलिसांच्या सूचनेचे पालन करावे. कायदा सुव्यवस्था राखणयासाठी पोलीस दलाला सर्वांनी सहकार्य करावे. ज्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे, तिकडे नागरिकांना जमण्याचे आवाहन करणे, हे बेकायदेशीर कृत्य आहे. अपप्रेरणा देणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली जाईल, असे अतिरिक्त आयुक्त दत्ता शिंदे यांनी सांगितले.
Mira Bhayandar News: रात्रीच्या अंधारात मनसे कार्यकर्त्यांची धरपकड
पोलिसांनी मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतर कालपासूनच प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात केली होती. मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर काहींना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. काल रात्रभर पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्यांची धरपकड सुरु होती. त्यामुळे मनसेचा आजचा मोर्चा निघणार की नाही, याबाबत अद्याप संभ्रम आहे.
आणखी वाचा