मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शनिवारी दसऱ्याच्या मुहूर्तावर पॉडकास्टच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) मुक्तकंठाने तारीफ केली. आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वर्धापनदिन. 99 वर्ष पूर्ण करत शंभरीत या संघटनेने पदार्पण केले. याबद्दल प्रत्येक संघ स्वयंसेवकाचं मनापासून अभिनंदन, असे राज ठाकरे यांनी म्हटले.
भारताला आपली मातृभूमी मानणारे सगळे हिंदू आहेत आणि या हिंदू समाजाचे एकत्रीकरण हे उद्दिष्ट घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. भारतीयत्व, राष्ट्रीयत्व, हिंदुत्व याचा अभिमान समाजामध्ये व्हावा यासाठी गेली 99 वर्ष संघाने निःसंशय मोठं काम केलं आहे. संघाचं काम मला कायमच अचंबित करतं. देशात कोणीतही नैसर्गिक आपत्ती आली तर तिथे तात्काळ धावून जाण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अग्रेसर असतो, असेही राज ठाकरे यांनी म्हटले.
एखाद्या संघटनेने 100 वर्ष काम करावं हे सोपं नाही: राज ठाकरे
संघातील बर्याच स्वयंसेवक व प्रचारकांशी माझा संवाद आहे. देशाच्या दुर्गम भागांमध्ये जाऊन काम करणं, तिथे भारतीयत्वाची, राष्ट्रीयत्वाची भावना रुजवणं, यासाठी त्यांना किती संघर्ष करावा लागतो याचा तपशील मला माहित आहे. मुळात एका विचाराला घट्ट धरून ठेवत, एखाद्या संघटनेने 100 वर्ष काम करावं हे सोपं नाही. जगाच्या इतिहासात मला नाही वाटत एखादी संघटना 100 वर्ष टिकली असेल आणि तरीही तिचा विस्तार सुरु असेल आणि ती कार्यशील असेल, असे राज ठाकरे यांनी म्हटले.
ही संघटना कायम जागृत ठेवणाऱ्या सर्व संघ स्वयंसेवकांना माझ्या अतिशय मनापासून शुभेच्छा. हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व रुजवण्यासाठी धडपडणारा प्रत्येक घटक, विचार हा असाच तेवत राहू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना, असेही राज ठाकरे यांनी म्हटले.
राज ठाकरेंचा मतदारांना सल्ला
महाराष्ट्राचं सोनं गेल्या अनेक वर्षांपासून लुटलं जातंय आणि आम्ही फक्त आपट्याची पानं वाटतोय.बाकीचे सर्व लोक सोनं लुटून जातायंत, पण आमचं दुर्लक्ष. आजचा दसरा हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो निवडणुकीच्या तोंडावर आहे. अशा वेळेला तुम्ही बेसावध राहून चालणार नाही. तुमच्यातला राग मला कधी दिसत नाही. त्याच-त्याच लोकांना तुम्ही निवडून देता. मतदानाच्या दिवशी तुम्ही मतांचं शस्त्र ठेवून देता आणि नंतर शस्त्र बाहेर काढता. शमीच्या झाडावरील शस्त्र काढण्याची हीच वेळ आहे. निवडणुकीत तुम्ही मतदारांनी क्रांती केली पाहिजे, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
आणखी वाचा