मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून सोलापूर, धाराशिवनंतर ते लातूरमध्ये पोहोचले आहेत. राज ठाकरेंचा (Raj Thackeray) सोलापूर दौऱ्यावर असतानाच मनसेनं विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारांची घोषणा केली होती. मुंबईतून मनसेचे नेते आणि राज ठाकरेंचे खास असलेल्या बाळा नांदगावकर यांना, तर सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांचा उमेदवारी जाहीर केली होती. आता, मनसेनं (MNS) तिसरा उमेदवार मैदानात उतरवला आहे. विशेष म्हणजे दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव आणि आमदार धीरज देशमुख (Dhiraj Deshmukh) यांच्याविरोधत मनसेचा उमेदवार जाहीर केला आहे. मनसेचे सरचिटणीस असलेल्या संतोष नागरगोजे यांना तिकीट देण्यात आलं आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा नवनिर्माण यात्रा सुरु असून आज बुधवार 7 ऑगस्ट रोजी त्यांनी मनसेच्या तिसऱ्या विधानसभा उमेदवाराची घोषणा केली. लातूर येथील शासकीय विश्रामगृहात राज ठाकरे यांनी मनसेचे सरचिटणीस संतोष नागरगोजे यांची लातूर-ग्रामीण विधानसभेसाठी उमेदवार म्हणून घोषणा केली. त्यामुळे, आता धीरज देशमुख यांना मनसेचे संतोष नागरगोजे यांचंही आव्हान आहे. सध्या या मतदारसंघातून धीरज देशमुख विद्यामान आमदार आहेत. त्यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या सचिन देशमुख यांचा 1 लाखांपेक्षा अधिक मतांधिक्याने पराभव केला होता.
भाजप नेते आणि माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर राज ठाकरे च्या भेटीला गेले होते. शिवाजीराव पाटील कव्हेकर भाजपाच्या किसान मोर्चाचे महाराष्ट्र आणि गोवा प्रभारी आहेत. कव्हेकरांच्या मतानुसार त्यांची भेट राजकीय नव्हती. मात्र, या भेटीमुळे शिवाजीराव पाटील कव्हेकर हे लातूर शहर विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक आहेत का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यातच, मनसेनं लातूर ग्रामीण मतदारसंघासाठी आपला उमेदवार जाहीर केला आहे. दरम्यान, 2019 मध्ये मनसेनं या मतदारसंघात उमेदवार दिला नव्हता. त्यामुळे, यंदा मनसेचंही आव्हान धीरज देशमुख यांना असणार आहे.
मनसेचे तीन उमेदवारी जाहीर
मनसे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा - नवनिर्माण यात्रा सुरु असून सोमवारी सोलापूर शासकीय विश्रामगृह येथे राज ठाकरे यांनी मनसेच्या दोन विधानसभा उमेदवारांची घोषणा केली होती. त्यामध्ये, 1. शिवडी विधानसभा : बाळा नांदगांवकर (Bala Nandgaonkar) आणि सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर विधानसभा : दिलीप धोत्रे (Dilip Dhotre) यांना तिकीट देण्यात आलं आहे. त्यानंतर, आता लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून तिसरा उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. संतोष नागरगोजे यांना मनसेनं मैदानात उतरवलं आहे.
हेही वाचा
5 वर्षानंतर पक्ष झोपेतून उठला, पुतण्याचा राज काकांवर हल्लाबोल, वरळी मतदारसंघावरही खोचक भाष्य