मुंबई : लोकसभा निवडणुकांची सांगता होताच महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या 4 जागांसाठीचा निवडणूक (Election) कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यासाठी, सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसेनं थेट उमेदवारीच जाहीर केली आहे. त्यामुळे, अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण, कोकण पदवीधर मतदार संघात भाजपचे (BJP) दोन वेळचे आमदार निरंजन डावखरे यंदा हॅटट्रीक करण्याच्या तयारीत आहेत. तर, कोकण पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडी, भाजपा आणि आता मनसेही आग्रही असल्याचे स्पष्ट झालं आहे. मात्र, मनसेनं (MNS) उमेदवार दिल्याने भाजपपुढे पेच निर्माण झालाय. त्यातच, मनसेच्या अविनाश जाधव यांनी भाजपला उद्देशून सवाल केला आहे. दरम्यान, याबाबत बैठक घेऊन निर्णय घेऊ, असे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये देखील या जागेवरून रस्सीखेच पाहायला मिळतेय 


महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानपरिषद आणि बाजार समित्यांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. उमेदवारी मिळण्यापासून विविध चर्चांना सध्या उधाण आलं आहे. त्यातच, राज्यातील शिक्षक, पदवीधर निवडणुकीसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून येत्या 26 जून रोजी मतदान होत आहे. तर 1 जुलैला मतमोजणी आहे. यासाठी आता उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात येत असून मनसेने अभिजीत पानसेंना उमेदवारी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे सध्या भाजपकडे असलेल्या कोकणातील जागेवरच मनसेनं ही उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे, भाजपचा मनसेच्या उमेदवाराला पाठिंबा आहे की, भाजपा विरुद्ध मनसे असा सामना होईल, याची सर्वांनाच उत्सुकता आहे. 


मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यामुळे, विधानपरिषद निवडणुकीत मनसेचे पदाधिकारी भाजपाकडून पाठिंब्याची अपेक्षा करत आहेत. हिंदुत्वाच्या विचारांनी आम्ही लोकसभा सोडायची, विधानसभा सोडायची, महापालिका सोडायची असा आमचा पक्ष चालणार आहे का?, असा सवालही मनसेच्या अविनाश जाधव यांनी अप्रत्यक्षपणे भाजपला केला आहे.   


आमची भूमिका स्वतंत्र्य लढण्याची आहे, आम्ही ही निवडणूक स्वतंत्र्य लढणार असल्याचे अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे. आम्ही मोदींसाठी पाठींबा दिला होता, विधानपरिषदेत मोदीत नाही. हिंदुत्वाच्या विचारांनी आम्ही लोकसभा सोडायची, विधानसभा सोडायची, महापालिका सोडायची असा आमचा पक्ष चालणार आहे का?, अशा शब्दात आगामी निवडणुकांत मनसे ताकदीने मैदानात उतरणार असल्याचेही अविनाश जाधव यांनी स्पष्ट केले. येणारी प्रत्येक निवडणूक मनसे लढणार असं राज साहेबांनी आपल्या भाषणात स्पष्ट सांगितलं होतं. आम्ही त्यांना पाठिंबा दिला आता ते आम्हाला देतील का? हे आता त्यांना विचारा. आमचं गणित हे विजयाच गणित आहे. आम्ही कुठलीही मागणी कोणाकडे करणार नाही, आम्ही त्यांच्यासाठी काम केलेलं आहे, आता त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा, असे म्हणत जाधव यांनी भाजपकडे बोट दाखवले आहे.  


पदवीधरांसाठी आमचा रोजगारनामा


पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी राज साहेबांनी जाहीर केली आहे, पदवीधरांसाठी उत्तम पर्याय दिलेला आहे, असे म्हणत अभिजीत पानसे यांनी राज ठाकरेंचे आभार मानले आहेत. पदवीधर मतदार संघाबाबत पदवीधरांची निराशा आहे. पदवीधरसाठी गेली अनेक वर्षे घसघशीत काम केलं गेलं नाही आणि होऊ शकलं नाही. बालशिक्षण, रचनात्मक बदल याचा मला अभ्यास आहे. पदवीधर झाल्यानंतर काय प्रश्न, काय संधी उपलब्धता आहे हे अजून पदवीधरांना माहित नाही, अशी खंत अभिजीत पानसे यांनी व्यक्त केली.  
कोकणातील मत्सव्यवसाय हा दक्षिण भारतीयांच्या हाती आहे, सर्व बोटी त्यांच्या हाती आहेत. त्यामुळे, पदवीधरांसाठी आमचा जाहीरनामा आणि वचननामा नसेल आमचा रोजगारनामा असेल, अशी माहितीही पानसरे यांनी दिली. बारा वर्षात आधीच्या आमदारानी केलं काय?, असा प्रश्न उपस्थित करत आमचा पक्ष आदेशावर चालतो, पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून मी ही निवडणूक लढतोय, असेही पानसरे यांनी म्हटले.