Maharashtra Politics : मुंबई शिक्षक पदवीधर मतदारसंघासाठी (Mumbai Teachers Constituency) जे आम्हाला पाठिंबा देतील त्यांनाच आम्ही इतर तीन मतदारसंघात पाठिंबा देऊ, असं वक्तव्य शिक्षक भारती आमदार कपिल पाटील (Kapil Patil) यांनी केलं आहे. महाविकास आघाडीमध्ये आघाडी धर्म पाळला गेला नाही का, असा सवाल यामुळे आता उपस्थित होत आहे. तीन वेळा जिंकलेल्या मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून ज.मो. अभ्यंकर यांना उमेदवारी देणं आश्चर्यकारक असल्याचंही कपिल पाटील यांनी म्हटलं आहे.  तीन टर्म शिक्षक आमदार असलेले कपिल पाटील निवडणूक का लढत नाहीत, असा सवाल उपस्थित होत आहे.


शिक्षक भारती आमदार कपिल पाटील यांनी म्हटलं आहे की, मुंबई शिक्षक मतदारसंघाचा मी गेले 18 वर्षे आमदार आहे, माझा शिक्षक 58 व्या वर्षी निवृत्त होतो, तोच निकष शिक्षक आमदाराला का नको? या भूमिकेतून तीन टर्म झाल्यानंतर मी निवडणूक न लढवण्याचा ठरवलं आहे. शिक्षक भारती संघटनेने सुभाष मोरे यांची उमेदवार म्हणून निवड केली आहे आणि आमचा विश्वास आहे की पुढचे आमदार हे सुभाष मोरे असतील. शिवसेना ठाकरे गटाने अभ्यंकर यांना उमेदवारी दिली.


महाविकास आघाडीमध्ये आघाडी धर्म पाळला गेला नाही का?


इंडिया आघाडीचा समाजवादी गणराज्य पक्ष हा घटक पक्ष आहे. हुकूमशाहीच्या विरोधात आम्ही काम केलं आहे. शर्त न ठेवता आम्ही त्यांना साथ दिली आहे. आघाडीचा एक धर्म असतो, ज्याची सीटिंग सीट असते, त्याला ती मिळते. मागील तीन टर्म आम्ही ही सीट लढत आलेलो आहोत आणि जिंकलेलो आहोत. आम्ही आधी इतर सर्व उमेदवारांना या मतदारसंघांमध्ये हरवलेलं आहे. आता धर्म पाळला की नाही, त्यांनी उमेदवार का दिला हा प्रश्न त्यांना विचारायला हवा, असंही कपिल पाटील यांनी म्हटलं आहे.


अभ्यंकरांनी उमेदवारी मिळणे आश्चर्यकारक


उद्धव ठाकरे यांना या संदर्भात मी विनंती केली होती. त्यासोबत शरद पवार यांची सुद्धा मी चर्चा केली होती. काँग्रेस नेत्यांसोबत सुद्धा मी बोललो होतो. आम्हाला वाटलं तर यातून मार्ग निघेल, पण अभ्यंकर यांची उमेदवारी आश्चर्यकारक वाटते, कारण एक तर वयाचा मुद्दा आहे. कंत्राटीकरण आणि खाजगीकरणाचे विरोधात आमची लढाई आहे. अभ्यंकर यांची भूमिका खाजगीकरणाची आहे, त्यामुळे ही लढाई आता विचारांची लढाई असेल. समाजवादी विचारांसोबत कधीही आम्ही तडजोड करत नाहीत. 


महाविकास आघाडीसोबत राहणार का?


ठाकरे गटाने वेगळा उमेदवार दिल्यानंतरही महाविकास आघाडीत राहणार का, या प्रश्नावर उत्तर देताना कपिल पाटील म्हणाले की, आता याचा निर्णय महाविकास आघाडीने घ्यायचा आहे. मुंबई शिक्षक मतदारसंघात जे आम्हाला पाठिंबा देतील, त्यांना आम्ही आता इतर तीन मतदारसंघात पाठिंबा देऊ, अन्यथा संघटना पुढचा विचार करेल, असा इशारा कपिल पाटील यांनी ठाकरे गटाला दिला आहे.


लोकसभा विधानसभेचे निवडणूक आम्ही वेगळ्या पद्धतीने पाहतोय मात्र ही सध्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाचे निवडणूक आहेत त्यामध्ये आम्ही उभे आहोत, असंही कपिल पाटील यांनी म्हटलं आहे.