ठाणे : मुंबई आणि परिसरात गेल्या काही दिवसांत मराठी (Marathi) आणि अमराठी असा भाषिक वाद पाहायला मिळत आहे. त्यामध्ये, मराठी माणसावरच इतर भाषिक हावी होत असून मराठी बोलण्यास किंवा मराठीचा जागर करण्यात थेट शब्दात नकार दिल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यातच, मुंब्रा येथे एका मराठी युवकाला माफी मागण्यास भाग पडल्याचं उघडकीस आलं आहे. एका फळविक्रेत्यास मराठी बोलण्यास भाग पाडल्याने येथील जमावाने एकत्र येत या युवकाला माफी मागायला लावली. तसेच, मराठी मे नही.. असे म्हणत मराठी बोलणार नसल्याचे सांगत हिंदीतच संवाद साधला. एबीपी माझाने ही बातमी दाखवल्यानंतर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच मनसैनिकांनी (MNS) या युवकाची पाठाराखण करत मुंब्र्यातील नागरिकांना थेट इशारा दिला आहे. या युवकाच्या व त्याच्या कुटुंबीयांच्या पाठीशी मनसे खंबीरपणे उभी आहे, याला काही झालं तर घरात घुसून मनसे काय आहे हे दाखवलं जाईल, अशा शब्दात मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी इशारा दिला आहे. 


"आता हा तरुण घाबरला आहे. पण त्याच्यासोबत मनसे खंबीरपणे उभी आहे. कोणाच्यात हिम्मत असेल तर त्याला काही करून दाखवावं, त्याला काही झालं तर त्यांना घरात घुसून महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय आहे, ते दाखवली नाही तर, आम्ही एका बापाची औलाद नाही", असेही पुढे अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे. कल्याणध्ये घडलेली घटना, ठाणे, विरार आणि मुंबईत झालेल्या घटनांमध्ये हेच पाहायला मिळते, की सत्तापरिवर्तन झाल्यानंतर यांची हिंमत वाढली आहे. मुंब्र्यातील घटनेत तर मराठी युवकावरच गुन्हा दाखल झाला आहे. तिथं काही मुस्लीम मुलं जमली, आणि पोलीस स्टेशनच्या आवारातच घोषणाबाजी केली. भविष्यात प्रत्येक मराठी माणसाला चौकाचौकात मारलं जाईल, एक दिवस हा प्रसंग तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला राज ठाकरेंची किंमत कळेल, असेही अविनाश जाधव यांनी म्हटलं. 


तर आम्ही जागेवरच तोडू


आता या मराठी युवकाच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी आहे, तुम्ही आता आरे करावं, आम्ही मुंब्र्यात जाऊन नाही कारे केलं तर त्यांना मनसे दाखवतो. मनसेचे 10 ते 12 आमदार निवडून आले असते, तर आज कोणाची हिंमत झाली नसती. पण हरकत नाही आम्ही मराठी माणसांवर प्रेम करतो, त्यांच्यासाठी आम्ही सदैव काम करत राहू. मराठी माणसावर कोणी हात उचलायचा प्रयत्न केला, तर त्याला जागेवर तोडा ही आम्हाला राजसाहेबांची शिकवण आहे. त्यामुळे, मराठी माणसावर कोणी हात उचलायचा प्रयत्न केला तर आम्ही त्याला जागेवरच तोडू, अशा शब्दात मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी इतर भाषिकांना व परप्रांतियांना थेट इशारा दिला आहे. 



आत्तापर्यंतची ही 4 थी घटना


"गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात किंबहुना ठाणे जिल्ह्यात हा प्रकार मोठ्या प्रमाणावर घडत आहे. ही आत्तापर्यंतची चौथी घटना आहे. आधी कल्याणमध्ये झाली, त्यानंतर ठाण्यात, नालासोपाऱ्यात, आज परत ही घटना घडली आहे. जर एखादा मुलगा मराठीत बोल असं सांगत आहे. म्हणून त्याला जर महाराष्ट्रात माफी मागावी लागत असेल तर हे आमचं दुर्भाग्य आहे. तुम्ही आम्हाला अभिजात भाषेचा दर्जा देऊन काय उपयोग आहे", असा सवाल यावेळी अविनाश जाधव यांनी उपस्थित केला आहे.


हेही वाचा


''शरद पवार अन् सुप्रिया सुळेंनी घरी बसावं, शेतीबाडी पाहावी, त्यांच्या वांग्याला बरेच पैसे मिळालेत''