डोंबिवली: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याची घोषणा केल्यानंतर राज्यभरात त्याचे पडसाद उमटत आहेत. राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे कट्टर चाहते असलेल्या कार्यकर्त्यांनी हा निर्णय मान्य करुन विधानसभेची तयारी सुरु केली आहे. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील (MNS) अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना राज ठाकरेंचा हा निर्णय फारसा रुचल्याचे दिसत नाही. त्यामुळे आता मनसेत राजीनामा सत्र सुरु झाले आहे.
डोंबिवलीतील मनसेचे पदाधिकारी मिहिर दवते यांच्यासह सात जणांनी राजीनामा दिला आहे. राज ठाकरे यांच्या बदलत्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम वाढल्याने मी राजीनामा दिल्याचे मिहिर दवते यांनी सांगितले आहे. मनसेच्या सोशल मिडिया ग्रुपवर राजीनामा दिला आहे. राज ठाकरे यांच्या भूमिकेनंतर डोंबिवलीतील अनेक मनसे पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता डोंबिवलीत राजीनाम्याचे लोण आणखी पसरणार का? मनसेला आणखी किती मोठे खिंडार पडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
मनसेचे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांचा राज ठाकरेंना अलविदा
राज ठाकरे यांच्या निर्णयानंतर मनसेचे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत मनसेला अलविदा करत असल्याचे जाहीर केले होते. 2019 मध्ये लोकसभा निवडणुकांवेळी राज ठाकरे यांनी मोदी-शाह यांच्याविरोधात भूमिका घेतली होती. आज अत्यंत निर्णायक क्षणी राजसाहेबांनी राजसाहेबांनी भूमिका बदलली. प्रबोधनकारांचा वारसा जपण्याचा प्रयत्न करणाऱ्या माझ्यासारख्याला 'भामोशा'चं असलं राष्ट्रीयत्व- 'हिंदुत्व' मान्यच होऊ शकत नाही. त्यामुळे मी मनसेचे सरचिटणीसपद आणि प्राथमिक सदस्यत्त्वाा राजीनामा देत असल्याचे किर्तीकुमार शिंदे यांनी सांगितले होते.
राज ठाकरेंना महायुतीत घेतल्याने भाजपच्या उत्तर भारतीय पदाधिकाऱ्यांचा ठाकरे गटात प्रवेश
राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिल्याने फक्त मनसेतच नव्हे तर भाजपमध्येही नाराजीचे वातावरण आहे. राज ठाकरे यांनी महायुतीला दिलेल्या पाठिंब्याच भाजपच्या प्रमुख नेत्यांनी स्वागत केले होते. त्यामुळे ठाण्यातील भाजपचे उत्तर भारतीय पदाधिकारी प्रचंड संतापले. या नाराज पदाधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून घेतले. ज्या राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांना कायम त्रास दिला, 'उत्तर भारतीय हटाव', अशी भूमिका घेतली त्यांना महायुतीत घेतल्याने भाजपचे हे पदाधिकारी नाराज झाल्याचे सांगितले जाते.
आणखी वाचा