जालना : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची (Election) रणधुमाळी सुरू असून प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील बडे नेते, मंत्री, खासदार प्रचारासाठी नगरपालिका क्षेत्रात जाऊन मतदारांना आवाहन करत आहेत. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी काही दिवसांपूर्वी निवडणूक प्रचार थांबल्यानंतर लक्ष्मीदर्शन होणार असल्याचे म्हटले. तर, दुसरीकडे आमच्या उमेदवाराला निवडून द्या, निधी देऊ असे आश्वासन सत्ताधारी पक्षाच्या नेत्याकडून दिले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील बहुतांश तालुक्यात पैशांचा विषय निघत आहे. कुणी म्हणतय, मताला 1 हजार तर कुणी म्हणतय मताला 2 हजारांचा भाव निघालाय. आता, राज्याचे माजी मंत्री तथा शिवसेना आमदार अब्दुल सत्तार (Abdul sattar) यांनीही निवडणुकीतील पैशांवरुन भाष्य केलं आहे.
शिवसेना नेते माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार हे नेहमी त्यांच्या बेताल वक्तव्याने चर्चेत असता. आता, निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने त्यांनी असंच एक वक्तव्य जालना जिल्ह्यातील अंबड येथे केले. येथे नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना महायुतीच्या नगरध्यक्षपदाच्या उमेदवार सना मुस्तकीन पटेल यांच्यासाठी त्यांनी सभा घेतली. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की, समोरचे जे पैसे देत आहेत ते काही त्यांच्या बापाच्या तिजोरीतून देत नाहीत,आपल्या तिजोरीतून खाल्लेले आहेत. त्यांनी पैसे दिले तर काजू, किसमिस म्हणून खाऊन घ्यायचे आणि धनुष्यबाणाचे बटन दाबायचे असे वक्तव्य अब्दुल सत्तार यांनी केले. त्यांच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
गुलाबराव पाटील यांचेही वादग्रस्त वक्तव्य - गुलाबराव पाटील
निवडणुकीच्या काळात तुम्हाला मटण देतील, ते खा. पण बटण आमचेच दाबा, नगरविकास आमच्याकडे आहे, नगरविकास विभागाकडे खूप माल आहे, त्यामुळे उठ भक्ता 1 तारखेला लक्ष्मी येणार, असे वादग्रस्त वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी नाशिक येथील सभेत केले होते. त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सारवासारव केली. नगरपालिका क्षेत्राचा विकास नगरविकास खाते करते, त्यामुळे नगरविकास खाते महत्त्वाचं आहे, असे स्पष्टीकरण एकनाथ शिंदे यांनी दिले होते. दरम्यान, राज्यातील नगरपालिका निवडणुकांच्या प्रचारात यंदा पैशाचा आणि विविध आमिष दाखवण्याचा जोर दिसत असून नेतेमंडळींकडून आश्वासनं दिली जात आहेत.