मुंबई : म्हाडाच्या (Mhada) कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे (Thane) शहर व जिल्हा, वसई (जि. पालघर) येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या ५३५४ सदनिका व ओरोस (जि. सिंधुदुर्ग), कुळगाव-बदलापूर येथील ७७ भूखंड विक्रीकरिता आयोजित संगणकीय सोडतीसाठी मंडळातर्फे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार अनामत रकमेसह प्राप्त पात्र अर्जांची सोडत आता दि. ११ ऑक्टोबर २०२५ रोजी ठाणे येथील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे काढण्यात येणार आहे, अशी माहिती मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी दिली.
नवीन वेळापत्रकानुसार सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची प्रारूप यादी दि. ०१ ऑक्टोबर, २०२५ रोजी सायंकाळी ६.०० वाजता 'म्हाडा'च्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. दिनांक ०३ ऑक्टोबर, २०२५ रोजी सायंकाळी ०६ .०० वाजेपर्यंत अर्जदारांना प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून ऑनलाईन दावे व हरकती नोंदविता येणार आहेत. सोडतीसाठी पात्र ठरलेल्या अर्जदारांची अंतिम यादी दिनांक ०९ ऑक्टोबर, २०२५ रोजी सायंकाळी ०६.०० वाजता 'म्हाडा'च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. दिनांक ११ ऑक्टोबर २०२५ रोजी सोडतीमध्ये यशस्वी ठरलेल्या व प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांची नावे म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.
कोकण मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेली ही सोडत पाच घटकांमध्ये विभागण्यात आली आहे. २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत एकूण ५६५ सदनिका, १५ टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजनेअंतर्गत ३००२ सदनिका, म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना व विखुरलेल्या सदनिका आहे त्या स्थितीमध्ये या योजनेअंतर्गत १७४६ सदनिका, म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजनेअंतर्गत (५० टक्के परवडणार्या१ सदनिका) ४१ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजनेअंतर्गत ७७ भूखंड विक्रीसाठी उपलब्ध आहेत. दरम्यान, सदर सोडतीसाठी १,८४,९९४ अर्ज प्राप्त झाले असून अनामत रकमेसह १,५८,४२४ अर्ज प्राप्त झाले आहेत.
हेही वाचा
कुख्यात निलेश घायवळची 10 बँक खाती पोलिसांकडून फ्रिज; आता पैसे वापरता येणार नाहीत, किती होती रक्कम?