नवी दिल्ली : राजकारणात एखादी भेट होणं आणि न होणं यातूनही अनेकदा संकेत दिले जातात. सध्या दिल्लीमध्ये अशाच एका भेटीची चर्चा सुरू आहे. कोथरूडचे आमदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) या महिन्यात जवळपास चार दिवस दिल्लीमध्ये आले होते. पण, त्यावेळी मोदी किंवा शाह यापैकी कोणाचीही भेट झाली नव्हती. पण कोथरूडच्या माजी आमदार आणि ज्यांना डावलून चंद्रकांत पाटील यांना तिकीट दिलं त्या मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांनी मात्र काल पंतप्रधान मोदींची ( PM narendra modi) घेतलेली भेट भाजपच्या अंतर्गत वर्तुळामधे चर्चेचा विषय बनला आहे.


विधानसभेला मेधा कुलकर्णी यांचे तिकीट नाकारले गेलं त्यानंतर त्यांचे राज्यात अद्याप कुठलेही पुनर्वसन झालेले नाहीये. पण भाजपमध्ये राष्ट्रीय महिला मोर्चाच्या पदाधिकारी म्हणून त्यांना जबाबदारी देण्यात आली आहे, त्या निमित्ताने त्या दिल्लीमध्ये येत असतात आणि त्या पार्श्वभूमीवर काल त्यांनी मोदींची भेट घेतली. त्या भेटीचे फेसबुकवर फोटो देखील मेधा कुलकर्णी यांनी शेअर केले आणि एक अद्भुत आणि अविस्मरणीय भेट झाल्याचं म्हटलं आहे.


याआधी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील दिल्लीत आले होते, त्यावेळी दिल्लीत दाखल झाल्यानंतर त्यांनी अमित शाह यांच्या भेटीचे संकेत दिले होते. दिल्लीत येण्याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांनी भेट घेतली होती. त्यामुळे यासंदर्भात दिल्लीत काही चर्चा होईल का? असं माध्यमांनी विचारल्यावर आपण अमित शाह यांच्या कानावर हा विषय नक्की घालू असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. पण त्या चार दिवसात चंद्रकांत पाटील यांची ना मोदींशी भेट झाली ना अमित शाहांशी. या पार्श्वभूमीवर त्यांच्याच मतदारसंघातल्या भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना मात्र पंतप्रधानांनी सविस्तर भेट दिल्याने यातून नेमके काय अर्थ काढायचे अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.


पंतप्रधान मोदी यांच्या भेटीनंतर कुलकर्णी काय म्हणाल्या?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्ली येथे भेट घेतली. कोरोना काळात वैधव्य आलेल्या महिलांना एकरकमी 5 लाख अथवा दरमहा 5000 वेतन देण्यात यावे यासाठी आपण राज्य सरकारांना सूचना करावी अशी विनंती मी माननीय पंतप्रधानांकडे केली. या भेटीत पुण्यातील लसीकरण, शनिवार वाड्याच्या जीर्णोद्धारासाठी निधी आदी विषय देखिल मी माननीय पंतप्रधानांसोबतच्या चर्चेत मांडले. मोदीजींनी या सर्व मुद्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला.


व्यस्ततेमुळे भेट नाही झाली : पाटील
संसदेचं अधिवेशन सुरू आहे. संसदेत अनेक महत्त्वाच्या विषयावर चर्चा होणार आहे. त्यामुळे शाह व्यस्त होते. त्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. शाह यांनी भेट नाकारल्याचं वृत्तही त्यांनी फेटाळून लावलं. संसदेच्या कामामुळे ही भेट झाली नसल्याचं त्यांनी सांगितलं.