MNS slap shopkeeper: मराठी भाषा न बोलणाऱ्या मीरारोड येथील परप्रांतीय दुकानदाराला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आल्यानंतर राज्यभरात वाद पेटला होता. मनसेच्या (MNS) या कृतीनंतर परराज्यातील अनेक हिंदी भाषिक नेते आक्रमक झाले होते. त्यांच्याकडून 'आम्ही मराठी बोलणार नाही, आम्हाला महाराष्ट्रातून बाहेर काढून दाखवा', अशा वल्गना करण्यात आल्या होत्या. यामध्ये आता वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असणारे भाजप खासदार निशिकांत दुबे (Nishikant Dubey) यांची भर पडली आहे. निशिकांत दुबे यांनी मराठीच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेणाऱ्यांना अप्रत्यक्षपणे 'कुत्रा' म्हणून संबोधले आहे.
खासदार निशिकांत दुबे यांनी सोशल मीडियावर मनसेला डिवचणारी एक पोस्ट केली आहे. ही पोस्ट त्यांनी मराठी भाषेत लिहली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे की,"हिंदी भाषिकांना मुंबईत मारणाऱ्यांनो, जर हिंमत असेल तर महाराष्ट्रात उर्दू भाषिकांना मारून दाखवा. आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो. कोण कुत्रा आणि कोण वाघ, स्वतःच ठरवा." निशिकांत दुबे यांनी आता या मुद्द्यावरुन वाघ आणि कुत्रा अशी तुलना केल्यामुळे हा वाद आणखीनच पेटण्याची शक्यता आहे. हे ट्विट करुन निशिकांत दुबे यांनी मराठीच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेणाऱ्यांना खुले आव्हान दिले आहे. त्यामुळे यावर आता मनसे आणि ठाकरे गट काय भूमिका घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. निशिकांत दुबे हे एरवीही वादग्रस्त बोलण्यासाठी कुख्यात आहेत. त्यांच्या या वक्तव्यावर आता महाराष्ट्रातील भाजप नेते काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल.
निशिकांत दुबे यांनी ठाकरे बंधूंची तुलना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि मसूद अजहर यांच्याशी केली आहे. दुबे यांनी यापूर्वी मुंबईतील मराठी-हिंदी वादाची काश्मिरी पंडितांच्या समस्येशी तुलना केली होती. मुंबईत उद्धव ठाकरे यांची शिवसेना, राज ठाकरे यांची मनसे, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आणि सलाउद्दीन, मौलाना मसूद अजहर आणि मुंबईत हिंदूंवर अत्याचार करणारा दाऊद इब्राहिम यांच्यात काय फरक आहे? एकाने हिंदू असल्यामुळे अत्याचार केला. दुसऱ्याने हिंदी असल्यामुळे अत्याचार केला, असे निशिकांत दुबे यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा