जालना: मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोध करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना ठार मारण्यासाठी ५० लाखांची सुपारी देण्यात आल्याचा उल्लेख असणारे पत्र समोर आले आहे. भुजबळांनी या पत्राविषयी पोलिसांना माहिती दिली आहे. याविषयी मनोज जरांगे-पाटील यांना विचारणा केली असता, हा सगळा बनाव भुजबळ यांनीच रचला असेल, असे त्यांनी म्हटले. छगन भुजबळ यांना कोणीही कशाला मारेल, असा सवालही त्यांनी विचारला. ते शनिवारी जालन्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.


यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांना आलेल्या धमकीची खिल्ली उडवली. छगन भुजबळांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्रातील सर्व पोलीस द्या. आम्हालाही अनेकदा धमक्या आल्या पण आम्ही आजपर्यंत पोलिसांना सांगितले नाही. छगन भुजबळ यांना कोण कशाला मारेल? हवं असेल तर सुरक्षेसाठी त्यांना पोलिसांचे कपडे घाला. पण भुजबळ म्हातारे आहेत, त्यांना कोणी मारणार नाही. पुरोगामी महाराष्ट्रावर म्हाताऱ्या व्यक्तींचा आदर करण्याचे संस्कार आहेत. त्यांना मारण्याची गरज नाही, ते असेच जातील. भुजबळांनी बीडमधील आपल्या नातेवाईकाचं हॉटेल मराठा आंदोलकांनी जाळल्याचा बनाव रचला तसाच आता पत्राचा बनाव रचला असेल. आपल्याच एखाद्या कार्यकर्त्याला धमकीचे पत्र द्यायला सांगितले असेल. छगन भुजबळांना रात्री जी स्वप्नं पडतात, तेच ते सकाळी उठून बोलतात, अशी टीका जरांगे पाटील यांनी केली.



पहाटे राष्ट्रपती राजवट उठवता येते मग मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे का घेता येत नाही? जरांगेंचा सवाल


मराठा आरक्षणाचा अध्यादेश राज्य सरकारने तातडीने मंजूर करुन त्याची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी शनिवारपासून जालन्यात पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या अध्यादेश मंजूर करण्यासाठी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी केली. दोन दिवसांत अधिवेशन बोलावून आमच्या व्याख्येप्रमाणे सगेसोयऱ्यांच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी. त्यासाठी मी आजपासून उपोषण सुरु करत आहे. या उपोषणादरम्यान मी पाणी पिणार नाही, तसेच उपचारही घेणार नाही, असे जरांगे पाटील यांनी सांगितले. मराठा आंदोलकांवरील गुन्हे अद्याप सरकारने मागे घेतलेले नाहीत. यापूर्वी सरकारने यापेक्षा भयानक गुन्हे मागे घेतले आहेत. मग मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे का घेतले जात नाहीत? राष्ट्रपती राजवट भल्या पहाटे उठवता येते मग गुन्हे मागे का घेता येत नाहीत? मराठा आरक्षणासाठी पुन्हा माझा जीव पणाला लावण्याची तयारी आहे, असेही जरांगे पाटलांनी यावेळी सांगितले.


 


आणखी वाचा


माझ्यासोबत घातपाताचा प्रकार,अंगावर गाडी घालण्याचाही प्रयत्न; मनोज जरांगेंचा मोठा गौप्यस्फोट