छत्रपती संभाजीनगर: मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून केली जात असतानाच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा भाजपचे उपाध्यक्ष नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी महत्वाचं वक्तव्य केले आहे. आर्थिक निकषांवरच आरक्षण (Reservation) मिळायला हवे. गरिबी हीच जात असावी. त्यासाठी समान नागरी कायद्याची (Union civil code) अंमलबजावणी व्हायला हवी, असे पाटील म्हणाले. छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात गुरुवारी पाटील यांनी महामंडळाचे अधिकारी व बँकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन योजनेचा आढावा घेतला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.


आर्थिकदृष्ट्या मागास हा एकच निकष असावा. गरिबी ही एक जात असावी. वार्षिक उत्पन्न आठ लाखांच्या खाली असणाऱ्यांचा या वर्गवारीत समावेश करावा. किती दिवस आपण जातींमध्ये भांडत बसायचे, हा विचार आजच्या तरुणांनी केला पाहिजे. मी मराठा, मी ओबीसी, मी धनगर, मी मुस्लीम, मी हिंदू असा भेद आपण किती दिवस करायचा? त्यामुळे आपण समान नागरी कायद्याला बळ दिलं तर जो गरीब आहे, त्याला न्याय मिळेल. परंपरेप्रमाणेच एखाद्याच परिवाराने आरक्षणाचे फायदे घेत राहिल्याने गरीब समाज अजूनही वंचित आहे. मग त्यामध्ये नवीन जाती समाविष्ट करा, जेणेकरुन हे प्रकरण मिटेल. 


राज्य सरकारचे शिष्टमंडळ आज लक्ष्मण हाकेंची भेट घेणार


राज्य सरकारचे शिष्टमंडळ आज ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी आंदोलन करत असलेल्या लक्ष्मण हाके यांची भेट घेणार आहे. या शिष्टमंडळात मंत्री उदय सामंत, गिरीश महाजन आणि अतुल सावे यांचा समावेश आहे. हे शिष्टमंडळ ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ यांची भेट घेईल.


लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आजचा नववा दिवस आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही याची सरकारने लेखी हमी द्यावी, या मागणीसाठी गेल्या आठ दिवसांपासून हे उपोषण सुरू असून या उपोषणाला आता सरकारचं शिष्टमंडळ भेट देणार आहे. आज गोपीचंद पडळकर देखील लक्ष्मण हाके यांच्या आंदोलन स्थळी दाखल होतील. काल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन मुख्यमंत्र्यांना फोनवर सरकारने आंदोलनाची दखल घेण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे सरकारी शिष्टमंडळ लक्ष्मण हाके यांना काही आश्वासन देणार का, हे पाहावे लागेल.


आणखी वाचा


मराठा,ओबीसी आरक्षणाबाबत केंद्र सरकारला बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही, पुढाकार घेऊन सोल्यूशन काढा: शरद पवार