मुंबई : राज्यातील मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) लढा अधिक तीव्र होत असून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) आपल्या उपोषणावर ठाम आहेत. विशेष म्हणजे उच्च न्यायालयानेही त्यांच्या आंदोलनास परवानगी दिली असून आझाद मैदानासाठी ते मोठ्या संख्येने मराठा कार्यकर्त्यांसह निघाले आहेत. त्यातच, आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी म्हणजे शिवनेरी गडावर माथा टेकवत त्यांनी पुढचा मार्ग धरला. दुसरीकडे ओबीसी समाजानेही साखळी उपोषणाची घोषणा केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) राज्यातील ओबीसी आणि मराठा समाजाच्या आंदोलनाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, प्रतिक्रिया देताना आरक्षणाचा प्रश्न आम्हीच सोडवल्याचं मुख्यमंत्र्‍यांनी म्हटलं.  

Continues below advertisement

माझी दोन्ही समाजाला विनंती आहे, दोन्ही समाजासाठी शासन काम करेल. ओबीसी समाजाने लक्षात ठेवावं आम्ही सर्व प्रश्न सोडवू, मराठा समाजाचे प्रश्न आम्हीच सोडवले, इतर कुणीही प्रश्न सोडवले नाहीत. मराठा समाजाला आपण आरक्षण दिलं आहे, कोर्टात टीकलेलं आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच, लोकशाहीत प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं आहे. मी आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच आरक्षणाचा प्रश्न सुटलेला आहे. आता मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण द्या म्हणतात, ओबीसीमध्ये अगोदरच 350 जाती आहेत. मात्र, मराठा समाजाला 10% आरक्षण दिलं आहे. 

लोकशाहीत सगळ्यांना आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे, लोकशाही पध्दतीने जेवढी आंदोलन होतील त्याला आम्ही सामोरे जाऊ. कुठलेही आंदोलन होवो, लोकशाहीच्या चौकटीबाहेर जाऊ नये, उच्च न्यायालयाने काही नियम निकष तयार केले आहेत, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीसांनी आपली भूमिका मांडली. 

Continues below advertisement

शनिवारपासून ओबीसी महासंघाचे साखळी उपोषण

ओबीसी समाजाची बैठक झाली असून शनिवारपासून नागपूरच्या संविधान चौकात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे साखळी उपोषण सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी केली आहे. तसेच, पुढील काळात गरज पडल्यास मुंबईकडे कूच करण्याची भूमिकाही तायवाडे यांनी स्पष्ट केली आहे. तर, प्रत्येक जिल्हात जनजागृती करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला आहे. मराठा समाज बांधवांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देवू नये ही आमची सरकारकडे मागणी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही याचे आम्ही स्वागत करतो. जरांगे यांच्या आंदोलनाच्या दबावात सरकारने कुठलही निर्णय घेऊ नये, यावर लक्ष ठेवले जाईल असेही तायवाडेंनी म्हटले. 

विरार दुर्घटनेवर मुख्यमंत्र्‍यांकडून शोक

गणेशपर्व हा महाउत्सव आहे, मी अनेकांकडे जाऊन दर्शन घेतोय. विरारमध्ये वाईट घटना घडली असून दुर्घटनेत 17 लोकांचा मृत्यू झाला आहे. एनडीआरएफने ठिकाणाची पाहणी करून अडकलेल्या लोकांना बाहेर काढलं आहे. या इमारतीला नोटीस दिली होती, स्ट्रक्चरल ऑडिटचीही नोटीस देण्यात आली होती. ही घटना गंभीर आहे, शासनाच्या वतीने 5 लाख रू प्रत्येकी मदत देण्याची घोषणा केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. अवैध इमारती आहेत, ह्या इमारतीलाही नोटीस दिली होती. लोक गरीब आहे, मात्र कुठे जायचं ह्याचा विचार करतात. दुसरी जागा दिली तरीही हलायला तयार नसतात. याप्रकरणाची चौकशी केली जाईल, असे फडणवीस यांनी म्हटले. तसेच, तात्काळ इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या महापालिकांना सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहितीही मुख्यमंत्र्‍यांनी दिली. 

हेही वाचा

बिहारमध्ये तीन दहशतवादी घुसले; एकीकडे गणेशोत्सव दुसरीकडे राहुल गांधींची यात्रा, पोलिसांकडून हाय अलर्ट