Satish Deshmukh Death: मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं, यासाठी काल (27 ऑगस्ट) अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना झाले. आज सकाळी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आता शिवनेरीवर पोहचले. यानंतर मनोज जरांगे पाटील आंदोलनासाठी मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. मात्र याचदरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. जुन्नरजवळ मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे. सतीश देशमुख असं मृत व्यक्तीचं नाव असून मुंबईतील मनोज जरांगेंच्या उपोषणापूर्वीच ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सतीश देशमुखांच्या मृत्यूनंतर मनोज जरांगे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मला आता माहिती कळाली की आमचा देशमुख नावाचा बांधव प्रवासात असताना त्यांचा दम छाटला आणि त्यांना अटॅक आला. मी याबाबत अजूनही माहिती घेत आहे. परंतु ही घटना अत्यंत दुःखद आहे. याला जबाबदार फडणवीस साहेब आहेत. तुम्ही आता जर का आम्हाला आरक्षण दिले तर आमचे बळी जाणार नाहीत. आमचे आणखी दोन बळी घेतले आहेत. लातूरला परवाच्या दिवशी अशीच घटना घडली आहे. आज देखील अशीच घटना घडली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलनासाठी 8 तासांची वेळ-
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी 8 तासांची वेळ दिली. पोलिसांना हमी देत जरांगेंनी ही वेळ मान्यही केलीये. मात्र शिवनेरीत पोहोचल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी वेगळीच भूमिका घेणार की काय असं दिसून आलं. त्यामुळे मनोज जरांगे आणि मराठा बांधव आता प्रशासनानं दिलेली 8 तासांची वेळ पाळणार की वेळेवर आणखी कोणती वेगळी भूमिका घेणार का हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसंच अटीशर्ती काढा अशी मागणी मनोज जरांगेंनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
मराठा समाजाच्या लेकरांच्या वेदनांना न्याय मिळाला पाहिजे- मनोज जरांगे
रायगड, शिवनेरी येथून प्रेरणा मिळते. खूप मोठ्या वेदना आहेत हे देवेंद्र फडणवीसांनी समजून घेतलं पाहिजे. मराठा समाजाच्या लेकरांच्या वेदनांना न्याय मिळाला पाहिजे, त्याला मुख्यमंत्र्यांनी साथ दिली पाहिजे. देवेंद्र फडणवीस कुणाला थांबवणार नाहीत, असं मनोज जरांगे म्हणाले. न्यायालयाने जे सांगितलं त्याप्रमाणे आम्हाला करावं लागलं. न्यायदेवतेनं सांगितलं परवानगी घ्या..., त्यानंतर एका दिवसाची आंदोलनाची परवानगी ही चेष्टा आहे. मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत परवानगी देऊ शकता. जाणूनबुजून तुम्ही एक दिवसाची परवानगी दिली, अशी टीका मनोज जरांगेंनी सांगितले.