जालना : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी विधानसभा निवडणुकांसाठी आपली भूमिका जाहीर केली आहे. राज्यातील काही निवडक मतदारसंघात आपण उमेदवार जाहीर करत असल्याचं त्यांनी म्हटलं. तसेच, एसी,एसटी मतदारसंघात आपण उमेदवार देणार नाही आणि ज्या मतदारसंघात उमेदवार देणार नाही, त्या मतदारसंघातील जो उमेदवार आम्हाला 500 रुपयांच्या बाँडवर मराठा आरक्षणासंदर्भात लिहून देईल, त्यांना पाठिंबा देण्यात येईल, असे जरांगे पाटील यांनी जाहीर केलं होतं. त्यानंतर, अंतरवाली सराटीत 500 रुपयांच्या बाँडवर लिहून देत उमेदवार पोहोचत आहेत. त्यावर, आता मनोज जरांगे यांनी महत्त्वाचं आवाहन केलंय. जरांगे पाटील यांच्या घोषणेनंतर त्यांच्याकडे 500 रुपयांच्या बाँडवर लिहून देत येणाऱ्या उमेदवारांची संख्या वाढली आहे. ज्या मतदारसंघात मनोज जरांगे पाटील यांच्याकडून उमेदवार देण्यात येणार नाही, त्या मतदारसंघातील इतर पक्षाच्या उमेदवारांकडून (Vidhansabha Election) बाँडवर लिहून घेतलं जाणार आहे. त्यामुळे, सध्या बाँड घेऊन अंतरवाली सराटी येथे जाणाऱ्यांची संख्या वाढल्याने मनोज जरांगे यांनी बाँड घेऊन येणाऱ्या उमेदवारांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. 


तुम्ही थेट बाँड घेऊन आमच्याकडे येऊ नका, सध्या काय व्हायलयं कुणीही 500 रुपयांचा बाँड घेऊन आमच्याकडे यायलंय. त्यामध्ये, एखाद्याकडे पैसे नसतील तर तो उसने पैसे घेऊन 500 रुपयांचा बाँड घेऊन लिहून देतोय. मराठ्यांचं मतदान आहे, म्हणून तुम्ही उगाच बाँड लिहित बसायचं असं करु नका. अगोदर आमच्याशी संपर्क करा, किंवा येऊन भेटा. जिथं आम्ही उमेदवार देणार नाहीत, तिथं कुठल्या पक्षाचा असेल किंवा अपक्ष उमेदवार असेल त्याचे मेरीट आम्ही तपासणार आहोत. समजा एखाद्याने आम्हाला बाँडवर लिहून दिलं नाही तर त्या मतदारसंघातील अपक्ष किंवा तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराला आम्ही पाठिंबा जाहीर करू, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले. 


मराठ्यांचं मतदान फिक्स आहे, पण तू काय केलंय लोकांसाठी, तूझं मतदार किती आहे, तुझं काम काय आहे हेही पाहिलं जाणार आहे. केवळ मराठ्यांचं मतदान मिळतंय म्हणून बाँडवर लिहून देतोय, हे चालणार नाही. आमच्याकडे डायरेक्ट बाँडवर लिहून आणून देऊ नका, असेही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. त्यामुळे, राज्यातील विविध मतदारसंघातील पक्षाच्या उमेदवारांनी बाँडवर लिहून देण्यापूर्वी जरांगे पाटील यांची भेट घेणे अपक्षित आहे. 


भाजपकडून मराठवाड्यात 10 मराठा उमेदवार


मराठवाड्यात जरांगे पाटील यांचा फॅक्टरचा प्रभाव कमी करण्यासाठी भाजपाने मराठवाड्यातून सर्वाधिक मराठा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. मराठवाड्यात भाजपने पहिल्याच यादीत 16 उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात तीन मतदारसंघ राखीव आहेत, 13 खुल्या मतदारसंघातुन मराठवाड्यात दहा मराठा समाजाचे उमेदवार भाजपने दिले आहेत. तर, औरंगाबाद पूर्व मतदार संघातून अतुल सावे आणि तुषार राठोड हे दोन ओबीसी चेहरे दिले आहे. तसेच, प्रशांत बंब यांच्यारुपाने जैन समाजाच्या चेहरा गंगापूर मतदारसंघातून निवडणुकीत उतरवला आहे. 


माजी आमदार संतोष सांबरे मनोज जरांगेंच्या भेटीला


जालना जिल्ह्यातील बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे इच्छुक आणि शिवसेना उबाठाचे माजी आमदार संतोष सांबरे यांनी आज मनोज जरांगे यांची भेट घेतली. जालन्यातील बदनापूर मतदारसंघ एससी जागेसाठी आरक्षित असून काल मनोज जरांगे यांनी आरक्षित जागेवर उमेदवार देणार नसल्याचे जाहीर केल्यानंतर संतोष सांबरे यांनी भेट घेऊन जरांगेंचे आभार मानले आहेत.


हेही वाचा


संभाजीराजेंच्या तिसऱ्या आघाडीचे 8 उमेदवार जाहीर, बच्चू कडू अचलपूरमधून; सांगलीत 2 उमेदवार