मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असतानाच एक धक्कादायक बातमी समोर आली होती. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची चर्चा सोमवारी सकाळपासून राजकीय वर्तुळात रंगली होती. तसेच संजय राऊत यांनीही अमित शाह यांची भेट घेतल्याचे काँग्रेस पक्षातील उच्चपदस्थ सूत्रांकडून सांगितले जात होते. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा भूकंप होणार का, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, या सगळ्यावर आता ठाकरे गटातील (Thackeray Camp) एका उच्चपदस्थ नेत्याने प्रतिक्रिया दिली आहे. या नेत्याने 'एबीपी माझा'शी बोलताना याबाबतची माहिती दिली.


शिवसेनेतील या वरिष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस आणि ठाकरे गटात जागावाटपाच्या मुद्द्यावरुन वाद जरुर आहे. पण ठाकरे गट विधानसभा निवडणुकीत एकट्याने लढण्याचा कोणताही विचार करत नाही. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाने काँग्रेस पक्षासाठी रामटेक आणि अमरावतीची जागा सोडली होती. रामटेकची सहा टर्म निवडून येणारी जागा ठाकरे गटाने मन मोठं करुन काँग्रेसला दिली होती. त्यावेळी ठाकरे गटाने मित्रपक्षांचा विचार केला होता. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत आम्हाला पक्षवाढीसाठी विदर्भात काही जागा काँग्रेसने सोडाव्यात, असे ठाकरे गटाचे म्हणणे असल्याची माहिती संबंधित नेत्याने 'एबीपी माझा'शी बोलताना सांगितले.


किमान तीन जागा द्या, ठाकरे गटाची मागणी


ठाकरे गटातील उच्चपदस्थ नेत्याच्या माहितीनुसार, विदर्भात आम्हाला पक्षवाढीसाठी काही संधी मिळावी, असे आमचे म्हणणे आहे. आम्ही लोकसभेला विदर्भात काँग्रेससाठी दोन जागा सोडल्या होत्या. त्या मोबदल्यात आता विधानसभेला विदर्भातील किमान तीन मतदारसंघ काँग्रेसने सोडावेत, अशी आमची मागणी आहे. त्याबद्दल आमची काँग्रेससोबत चर्चा सुरु आहे. मात्र, नाना पटोले विदर्भातील या तीन जागा सोडायला तयार नाहीत. आम्ही काँग्रेसला लोकसभा निवडणुकीवेळी सिटींग खासदाराची सीट दिली. त्यामुळे आता आम्हाला तीन जागा द्याव्यात. या सगळ्यावर आज किंवा उद्यापर्यंत तोडगा निघेल. आम्ही महाविकास आघाडीसोबतच राहणार आहोत. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची कोणतीही भेट झालेली नाही. आम्हाला जागावाटपात विदर्भात सन्मानजनक जागा मिळाव्यात, इतकी आमची अपेक्षा असल्याचे ठाकरे गटाच्या नेत्याने सांगितले. तर काँग्रेसच्या नेत्यांनी लोकसभेला आम्ही ठाकरे गटाला जास्त जागा दिल्या, आता त्यांनी विधानसभेसाठी आम्हाला जास्त जागा द्याव्यात, असा युक्तिवाद काँग्रेसच्या गोटातून केला जात आहे.


नेमकी काय चर्चा?


सोमवारी सकाळपासून राजकीय वर्तुळात फिरत असलेल्या बातमीनुसार, उद्धव ठाकरे स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याचे काँग्रेसमधील सूत्रांचं म्हणणं आहे. ठाकरेंच्या आक्रमक बाण्याने काँग्रेसनेही स्वबळावर लढण्याची तयारी केल्याचं चित्र आहे. संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचं काँग्रेसमधील सूत्रांचं म्हणणं आहे. तर उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचा दावा केला जात आहे. भाजप ठाकरेंबाबत 'बिहार पॅटर्न' राबवण्याची भीती काँग्रेसला सतावत असल्याचे सूत्रांचे म्हणणे होते. मात्र,काँग्रेसच्या नेत्यांनी या बातमीत तथ्य नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.



आणखी वाचा


ती बातमी पेरली गेलीय, आमच्यात भांडणं लावण्याचा प्रयत्न; ठाकरे-फडणवीस भेटीवर काँग्रेसचं स्पष्टीकरण