Manikrao Kokate resignation: बनावट कागदपत्रं दाखवून शासकीय कोट्यातली सदनिका लाटल्याप्रकरणी न्यायालयाने दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate news) यांनी गुरुवारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. माणिकराव कोकाटे हे राज्याचे क्रीडामंत्री होते. यापूर्वी त्यांची कृषीमंत्रीपदावरुन उचलबांगडी झाली होती. त्यानंतर आता दुसऱ्यांदा वादात अडकल्याने माणिकराव कोकाटे यांच्यावर मंत्रिपदच गमावण्याची वेळ आली आहे. अजित पवार (Ajit Pawar) हे माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्यास फारसे इच्छूक नव्हते. त्यांना उच्च न्यायालयाच्या निर्णयापर्यंत वाट पाहायची होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कोकाटे यांच्यासारख्या कलंकित नेत्याला मंत्रिमंडळात ठेवण्यास विरोध केल्याने अजित पवार यांचा नाईलाज झाल्याचे समजते. आता माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद रिक्त झाल्याने त्याजागी कोणाची वर्णी लागणार, याविषयी राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवण्यास सुरुवात झाली आहे.
अलीकडेच धनंजय मुंडे यांनी दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या जागी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची पुन्हा मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते, अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र, धनंजय मुंडे यांच्या वाल्मिक कराड कनेक्शनमुळे त्यांचे मंत्रिमंडळातील पुनरागमन म्हणावे तितके सोपे नाही. तरीही कोकाटेंच्या जागी मंत्रिपदासाठी धनंजय मुंडे हेच सगळ्यात फेव्हरिट मानले जात आहेत. परंतु, अजित पवार ऐनवेळी जातीय समीकरण साधण्यासाठी वेगळा निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
माणिकराव कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्याची नेमणूक जिल्हा परिषद निवडणुका संपल्यावरच केली जाईल, असे सांगितले जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपेपर्यंत माणिकराव कोकाटे यांच्याकडील क्रीडा व अल्पसंख्याक खाते अजित पवारांकडेच राहील. मंत्रिपद देताना अजित पवारांकडून जातीय समीकरण साधण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे. मंत्रिपदासाठी इच्छूक असलेल्यांमध्ये अनिल पाटील, धनंजय मुंडे, संजय बनसोडे यांचा समावेश आहे. परंतु, दुसरीकडे अजित पवार मंत्रिमंडळात एखाद्या नव्या चेहऱ्याला संधी देणार का, याविषयी चर्चा रंगली आहे. माणिकराव कोकाटे यांच्या जागी मराठा समाजातील नव्या चेहऱ्याचा विचार केला तर प्रकाश सोळंखे, संग्राम जगताप, सुनील शेळके यांनाही मंत्रिपदाची संधी मिळू शकते. त्यामुळे आता अजित पवार नेमकं काय करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
आणखी वाचा