Manikrao Kokate and Ajit Pawar: वादग्रस्त वक्तव्यांमुळे सातत्याने वाद ओढावून घेणारे आणि अधिवेशन सुरु असताना सभागृहात रमी खेळत असल्याचा आरोप झाल्यामुळे कृषीमंत्रपद गमवावे लागलेले अजितदादा गटाचे नेते माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांचे मंत्रिपद दुसऱ्यांदा धोक्यात आले आहे. नाशिक जिल्हा न्यायालयाने मंगळवारी माणिकराव कोकाटे हे सदनिका घोटाळाप्रकरणी दोषी असल्याचा प्रथम वर्ग न्यायालयाचा निकाल कायम ठेवत त्यांची दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षाही कायम ठेवली होती. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांना आता क्रीडामंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागणार, अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर बुधवारी मुंबईत माणिकराव कोकाटे हे राष्ट्रावादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेणार आहेत. या भेटीत माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रि‍पदाबाबत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. (Nashik news)

Continues below advertisement

यापूर्वी सभागृहात रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने माणिकराव कोकाटे संकटात सापडले होते. त्यावेळी माणिकराव कोकाटे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा, यासाठी विरोधकांनी प्रचंड दबाव निर्माण केला होता. परंतु, अजित पवार यांनी त्यावेळी माणिकराव कोकाटे यांचे कृषीमंत्रीपद काढून घेत त्यांना क्रीडामंत्री केले होते. मात्र, आता जिल्हा न्यायालयाने सदनिका घोटाळाप्रकरणात माणिकराव कोकाटेंची दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवल्याने नैतिकतेचा मुद्दा उपस्थित झाला आहे. त्यामुळे आज माणिकराव कोकाटे हे अजित पवारांसमोर कशाप्रकारे बाजू मांडतात, हे पाहावे लागेल. जिल्हा न्यायालयाच्या निकालाविरोधात आपण वरिष्ठ कोर्टात जाऊ, असे सांगून माणिकराव कोकाटे अजितदादांकडून अभय मागू शकतात. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाई व्हावी, असा मतप्रवाह नाही. तसेच महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर माणिकराव कोकाटेंच्या मंत्रि‍पदाचा राजीनामा घेतल्यास विपरीत पडसाद उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता अजित पवार हे गेल्यावेळप्रमाणे माणिकराव कोकाटे यांना पुन्हा एकदा पाठीशी घालणार की त्यांना मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायला सांगणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

Manikrao Kokate news: माणिकराव कोकाटेंना कोणत्या प्रकरणात शिक्षा झाली?

Continues below advertisement

नाशिक शहरातील उच्चभ्रू परिसरात माणिकराव कोकाटे यांनी 30 वर्षांपूर्वी अल्प उत्पन्न गटातून सदनिका मिळवली होती. स्वत:सह भाऊ विजय कोकाटे, पोपट सोनवणे आणि प्रशांत गोवर्धने या चार जणांनी कॅनडा कॉर्नर भागात निर्माण व्ह्यू अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून अल्प उत्पन्न गटासाठीच्या सदनिका प्राप्त केल्या होत्या. यानंतर तत्कालीन दिवंगत राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांच्या तक्रारीवरून जिल्हा प्रशासनाने सदनिका वाटपाची चौकशी केली होती. प्रथम वर्ग न्यायालयाने या प्रकरणात माणिकराव कोकाटे यांच्यासह त्यांच्या भावाला प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास आणि 50 हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली होती. या निर्णयाविरोधात माणिकराव कोकाटे यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. परंतु, मंगळवारी झालेल्या सुनावणीत जिल्हा न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

आणखी वाचा

रात गई बात गई... पत्रकाराने 'तो' प्रश्न विचारताच माणिकराव कोकाटे म्हणाले, नवी इनिंग जोरदार खेळणार!

ऑनलाईन पत्ते खेळून झाले, शासनाला चुना लावून शिक्षाही झाली, आता तरी कोकाटेंचा राजीनामा घेणार का? रोहित पवारांचा सवाल