Manikrao Kokate: नाशिकच्या सदनिका घोटाळा प्रकरणात दोषी ठरल्यानंतर मंत्रिपदाचा राजीनामा दिलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्याबाबत आज अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. मुंबईतील लीलावती रुग्णालयात कोकाटेंवर अँजिओग्राफी करण्यात आली असून, त्यांच्या प्रकृतीचा अहवाल आता कायदेशीर कारवाईसाठी निर्णायक ठरणार आहे.

Continues below advertisement

Manikrao Kokate: पोलिसांकडून अँजिओग्राफी अहवालाची मागणी

सूत्रांच्या माहितीनुसार, नाशिक पोलिसांनी लीलावती रुग्णालय प्रशासनाकडे अँजिओग्राफीसंदर्भातील सविस्तर वैद्यकीय अहवालाची अधिकृत मागणी केली आहे. कोकाटेंची प्रकृती स्थिर असल्याचे अहवालातून स्पष्ट झाल्यास, आजच अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी चर्चा आहे. मागील दीड तासांपासून नाशिक पोलिसांची टीम लीलावती रुग्णालयात तळ ठोकून आहे. अँजिओग्राफीचा अहवाल मिळाल्यानंतर तो थेट न्यायालयात सादर केला जाणार आहे.

Manikrao Kokate: लीलावती रुग्णालय मेडिकल बुलेटीन काढणार 

लीलावती रुग्णालय प्रशासन आज दुपारी चार वाजता मेडिकल बुलेटिन प्रसिद्ध करून कोकाटेंच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती देणार आहे. सध्या कोकाटे अतिदक्षता विभागात (ICU) उपचार घेत असून, उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. रुग्णालयात त्यांची मुलगी सीमंतिनी कोकाटे आणि पत्नी सीमा कोकाटे उपस्थित आहेत. डॉक्टरांच्या प्राथमिक मतानुसार, कोकाटेंना पूर्ण विश्रांतीची आवश्यकता असून, कोणताही मानसिक किंवा शारीरिक ताण टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Continues below advertisement

Manikrao Kokate: उच्च न्यायालयातील सुनावणी आणि अटक वॉरंटचा तिढा

दरम्यान, आज दुपारी तीन वाजता मुंबई उच्च न्यायालयात माणिकराव कोकाटे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. या याचिकेत सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, उच्च न्यायालयातील सुनावणीचा थेट संबंध नाशिक मुख्य दंडाधिकारी न्यायालयाने जारी केलेल्या अटक वॉरंटशी नाही. नाशिक मुख्य दंडाधिकारी न्यायालयाने या प्रकरणातील आरोपींना दोषी ठरवत अटक करून न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, उच्च न्यायालयाने या आदेशाबाबत स्थगिती देता येईल का, यावर निरीक्षण (टिप्पणी) नोंदवली असून, यामुळे कायदेशीर स्थिती अधिक गुंतागुंतीची झाली आहे.

Manikrao Kokate: आजचा दिवस निर्णायक

सूत्रांच्या माहितीनुसार, कोकाटेंची प्रकृती स्थिर असल्याचा वैद्यकीय अहवाल मिळाल्यास आणि वरिष्ठ पातळीवर सल्लामसलत झाल्यानंतर नाशिक पोलीस आजच अटकेचा निर्णय घेऊ शकतात. एकीकडे उच्च न्यायालयातील सुनावणी, दुसरीकडे वैद्यकीय अहवाल आणि तिसरीकडे अटक वॉरंटची अंमलबजावणी, यामुळे माणिकराव कोकाटेंसाठी आजचा दिवस अत्यंत निर्णायक ठरणार आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Manikrao Kokate resigns: माणिकराव कोकाटेंचा राजीनामा, अजितदादा कोणत्या नेत्याला कॅबिनेटमध्ये घेणार, धनंजय मुंडेंसह 'हे' सहाजण मंत्रि‍पदाच्या शर्यतीत